गडचिरोलीत ३० फूट खोल विहिरीत पडलेल्या गोऱ्ह्याला वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:20 PM2020-02-21T13:20:45+5:302020-02-21T13:21:06+5:30
दोन गोऱ्ह्याच्या भांडणात एक गोऱ्हा (बैल) विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर कोरची येथील ग्रामस्थांनी त्याला अवघ्या तासाभरात बाहेर काढण्यात यश मिळवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: दोन गोऱ्ह्याच्या भांडणात एक गोऱ्हा (बैल) विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर कोरची येथील ग्रामस्थांनी त्याला अवघ्या तासाभरात बाहेर काढण्यात यश मिळवले.
शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास कोरची येथील मुख्य मार्गावर असलेल्या वळणावरील बाबा ताज ढाबा येथील आवारात ही विहीर आहे. सकाळच्या वेळी दोन बैलांमध्ये झटापट सुरू झाली. त्यादरम्यान एक बैल विहिरीत पडला. या विहिरीला जाळीचे झाकण होते. मात्र त्याच्या वजनाने हे झाकणही तुटले व गोऱ्हा पाण्यात कोसळला. ही घटना घडल्याचे दिसताच जवळपासचे नागरिक तिथे धावले.
ही विहीर जवळपास ३० फूट खोल होती. या बैलाला बाहेर काढण्यासाठी विविध प्रयत्न सुरू झाले. आधी विहिरीत लाकूड टाकण्यात आले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अखेरीस नगरपंचायतीचे सफाई कामगार दयाराम मडावी व ढाबा मालक वसीम शेख हे दोघेही दोर घेऊन विहिरीत उतरले. त्यांनी या बैलाला दोराने बांधले. व विहिरीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी दोर वर खेचून बैलाला बाहेर काढले.
यावेळी कोरचीचे नगराध्यक्ष नसरुद्दीन भामाणी, गोपाल शेंद्रे, कादीर अंसारी, मोहन वाल्दे आदी नागरिकांनी मदतीचा हात दिला.