बंधाऱ्याचे काम निकृष्ट
By admin | Published: May 2, 2017 01:11 AM2017-05-02T01:11:56+5:302017-05-02T01:11:56+5:30
तालुक्यातील पलखेडा शेतशिवारात बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे.
पालखेडा येथे बांधकाम : शेतकरी व भाजप पदाधिकाऱ्यांची तक्रार
धानोरा : तालुक्यातील पलखेडा शेतशिवारात बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने या बांधकामाची चौकशी करून नव्याने बांधकाम करण्याचे निर्देश कंत्राटदाराला द्यावे, अशी मागणी होत आहे.
पलखेडा येथील धान उत्पादक शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सिमेंट काँक्रिट बंधाऱ्याचे बांधकाम केले जात आहे. सदर बांधकाम मागील महिनाभरापासून सुरू आहे. बंधाऱ्यावर थ्रेशर मशीनने फोडलेली काळी गिट्टी वापरने आवश्यक असतानाही या ठिकाणी स्थानिक मजुरांकडून फोडलेली बोल्ड गिट्टी वापरली जात आहे. बंधाऱ्यासाठी अत्यंत कमी प्रमाणात सिमेंट वापर केला जात असल्याचे बंधाऱ्याच्या बांधकामावरून दिसून येते. सदर बंधाऱ्याची अवस्था बघितली तर हा बंधारा पहिल्याच पावसाच्या पाण्यात वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंधारा वाहून गेल्यास यावर झालेला लाखो रूपयांचा शासनाचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी प्रल्हाद उईके, नीलेश गेडाम, विजय शेडमाके, अनुसया फटिंग, गीता शेडमाके, माधव कटी, मनोहर फटिंग, प्रकाश नरोटे, लोगेश हेडो यांनी केली आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर सदर कामाला भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष गोपाल उईके, माजी महामंत्री कैलास गुंडावार यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले. या बंधाऱ्याच्या बांधकामाकरिता वृक्षतोडसुद्धा करण्यात आली आहे. निकृष्ट बंधाऱ्याबाबत संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)
कोट्यवधींचा खर्च पाण्यात
धानोरा तालुक्यात आजपर्यंत अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांवर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला आहे. मात्र सदर बंधारे अगदी दोन ते तीन वर्षातच वाहून गेल्याने या बंधाऱ्यांचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. यावर झालेला खर्च पाण्यात गेला आहे. बंधारा बांधकामासाठी लाखो रूपये मंजूर केले जातात. मात्र मंजूर निधीच्या ५० टक्केही निधी बंधाऱ्यावर खर्च केला जात नाही. त्यामुळे बंधाऱ्याची चौकशीची मागणी आहे.