बंडीला जुंपलेली बैलजोडी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:38 PM2019-04-20T23:38:36+5:302019-04-20T23:39:26+5:30
जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलांचा स्पर्श होऊन बंडीला जुंपलेली बैलजोडी जागेवरच ठार झाली. प्रसंगावधान राखत शेतकरी व त्याची आई बैलबंडीवरून उतरल्याने ते सुखरूप आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलांचा स्पर्श होऊन बंडीला जुंपलेली बैलजोडी जागेवरच ठार झाली. प्रसंगावधान राखत शेतकरी व त्याची आई बैलबंडीवरून उतरल्याने ते सुखरूप आहेत. सदर घटना देसाईगंज तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) गावात शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
मोहटोला येथील शेतकरी योगाजी दिनाजी दोनाडकर (३२) व त्यांची आई पार्वताबाई दिनाजी दोनाडकर (६०) हे दोघे बैलबंडीने शेतावर जात होते. जुना किन्हाळा या गावची मुख्य विद्युत लाईन या भागातून गेली आहे.
किन्हाळा गाव पुनर्वसित झाल्यापासून तेथील प्रवाह बंद करण्यात आला होता. या तारा जमिनीवर पडल्या होत्या. याच भागातून नव्याने विद्युत पंपासाठी वीज तारा टाकण्यात आल्या आहेत. चालू व बंद असलेल्या दोन्ही वीज तारा एकमेकांना ओलांडून गेल्या आहेत. मृत तारांचे खांब कालपरत्वे. जमिनीकडे कलत आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या रात्री मृत तारांचा स्पर्श जीवंत तारांना झाला. त्यामुळे
मृत तारांना वीज प्रवाह सुरू झाला. याच तारांना दोन्ही बैलांचा स्पर्श होऊन बैलबंडीला जुपलेल्या स्थितीतच दोन्ही बैल ठार झाले. संबंधित शेतकऱ्याचे जवळपास ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.
संबंधित शेतकºयाची बैलबंडी लोखंडी आहे. मात्र बैलांच्या मानेवर ठेवलला जू हा लाकडी असल्याने बैलांना लागलेला वीज प्रवाह बंडीपर्यंत प्रवाहित झाला नाही. त्यामुळे बंडीवर बसलेल्या शेतकºयाला विजेचा धक्का लागला नाही.
या परिसरातील अनेक वीज खांब जमिनीकडे झुकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे भविष्यातही या वीज तारांपासून धोका आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
निकामी झालेल्या तारा उचलण्यात याव्या, अशी मागणी शेतकºयांनी महावितरणच्या गाव पातळीवरील लाईनमनकडे केली होती. मात्र संबंधित लाईनमनने याकडे दुर्लक्ष केल्याने एवढा मोठा अनर्थ घडला. त्या तारांना वीज पुरवठा सुरू नसल्याने काहीच होणार नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती संबंधित लाईनमन देत होता. त्या लाईनमनच्या वेतनातून बैल जोडीची रक्कम वसूल करून संबंधित शेतकºयाला महावितरणने ताबडतोब द्यावी. त्याचबरोबर संबंधित लाईनमनला निलंबित करावे, अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन केला जाईल, असा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.