१० कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ५० गावांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:31+5:302021-07-07T04:45:31+5:30

वैरागड : महाराष्ट्र राज्य वीज वितरण केंद्र वैरागडअंतर्गत ५० लहान-मोठ्या गावांचा समावेश असून, वैरागड ते भाकरोडीपर्यंत समावेश असणाऱ्या ५० ...

The burden of 50 villages on the shoulders of 10 employees | १० कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ५० गावांचा भार

१० कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ५० गावांचा भार

Next

वैरागड : महाराष्ट्र राज्य वीज वितरण केंद्र वैरागडअंतर्गत ५० लहान-मोठ्या गावांचा समावेश असून, वैरागड ते भाकरोडीपर्यंत समावेश असणाऱ्या ५० गावांतील वीज वितरण व्यवस्था केवळ १० कर्मचाऱ्यांना सांभाळावी लागत असल्याने वीज कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे.

वैरागड येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. या ठिकाणी एक कनिष्ठ अभियंता आणि आठ-दहा वर्षांपूर्वी २३ कर्मचारी कार्यरत होते; पण मागील १० वर्षांत या कार्यालयात कार्यरत काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले, तर काहींची या ठिकाणाहून बदली झाली. त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. वर्षभरापूर्वी येथील कार्यालयात कनिष्ठ अभियंता भवरे यांची बदली झाली तेव्हापासून वैरागड मंडळ कार्यालयाचा भार आरमोरी येथील अभियंत्याकडे दिला आहे; पण दुसरे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असल्याने ते वैरागड कार्यालयात अल्पवेळ हजर राहात असल्यामुळे विद्युत ग्राहकांची कामे रेंगाळली आहेत.

वैरागड कार्यालयात कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नसल्याने ग्राहकांना आल्यापावली गावी परतावे लागत आहे.

वैरागड कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वीज ग्राहकांचे आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, होणारी अडचण टाळण्यासाठी वैरागड वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिक कर्मचारी आणि वर्षभरापासून रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

(बॉक्स)

वीज ग्राहकांसह शेतकऱ्यांना आरमोरीची पायपीट

येथील वीज केंद्राच्या कार्यक्षेत्रात वैरागड, मोहझरी, सुकाळा, नागरवाही, शिवनी, मानापूर, देलनवाडी, मांगदा, कोसरी, कुलीकुली, पिसेवडधा, कुरडी, डोंगरतमासी, वडेगाव, मेंढा व भाकरोंडी परिसरातील अनेक गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावातील वीज ग्राहकांची मोठी संख्या आहे. कृषी पंपधारक शेतकरी आणि वारंवार विजेचा लपंडाव, कमी विद्युत दाब यामुळे नागरिकांच्या बऱ्याच समस्या असतात. गावाप्रमाणे नेमून दिलेले वीज कर्मचारी हे ग्राहकांच्या तक्रारीनुसार तांत्रिक अडचणी पूर्ण करतात; पण वीज ग्राहक, कृषीपंपधारक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी सोडविण्यासाठी आरमोरी कार्यालयात पायपीट करावी लागत आहे

Web Title: The burden of 50 villages on the shoulders of 10 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.