तीन तालुक्याचा भार एकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:50+5:30
धानोरा येथील बांधकाम विभागीय कार्यालयातील अधिकारी व्ही. एस. चवंडे ७ जुलैैपासून रजेवर आहेत. ते रजेवर गेल्याने त्यांच्या कार्यालयाचा प्रभार कोरची येथील उपविभागीय बांधकाम अधिकारी धार्मिक यांच्याकडे देण्यात आला. विशेष म्हणजे धार्मिक यांच्याकडे आधीच कुरखेडा व कोरची येथील कार्यालयाचा प्रभार असताना त्यांच्या कामाचा व्याप वाढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : जिल्हा परिषद अंतर्गत धानोरा, कुरखेडा, कोरची उपविभागीय बांधकाम कार्यालयाचा प्रभार एकाच उपविभागीय अधिकाऱ्याकडे असल्याने त्यांना तीन कार्यालय सांभाळतांना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या अनेक कामांमध्ये अडचणी येत आहेत. असे असतानाही संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे बांधकाम उपविभागीय अधिकाऱ्याचा प्रभार देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
धानोरा येथील बांधकाम विभागीय कार्यालयातील अधिकारी व्ही. एस. चवंडे ७ जुलैैपासून रजेवर आहेत. ते रजेवर गेल्याने त्यांच्या कार्यालयाचा प्रभार कोरची येथील उपविभागीय बांधकाम अधिकारी धार्मिक यांच्याकडे देण्यात आला. विशेष म्हणजे धार्मिक यांच्याकडे आधीच कुरखेडा व कोरची येथील कार्यालयाचा प्रभार असताना त्यांच्या कामाचा व्याप वाढला. तीन तालुके सांभाळताना त्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. कोरची ते धानोरा हे अंतर खूप लांब आहे. २७ जुलैैला रूजू झाल्यानंतर धार्मिक हे ६ ऑगस्टला आढावा बैठकीत हजर होते. त्यानंतर ११ ऑगस्टला तहसील कार्यालयात शासकीय कामासाठी आले होते. तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. कामाची देयके तसेच देखरेख व दोन वर्षापासून आदिवासी ठक्करबाप्पा योजनेंतर्गत सुरू असलेली कामे त्यांची देयके काढणे, जिल्हा परिषद निधी, आमदार-खासदार निधी, १४ वा वित्त आयोग निधी, नक्षलग्रस्त निधीतून सुरू असलेल्या विविध कामांची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्याकडे त्याचा प्रभार द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
कामाच्यास्थळी भेटी कोण देणार?
जिल्हा परिषद बांधकाम उपविभागांतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामाची पाहणी केल्यानंतरच त्या कामांची देयके काढणे गरजेचे असते. परंतु तीन ठिकाणच्या प्रभारामुळे अधिकारी कार्यालयातच उपस्थित राहत नसल्याने कामाच्यास्थळी भेट कोण देणार? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे.