बुर्गीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू
By admin | Published: May 2, 2017 01:14 AM2017-05-02T01:14:52+5:302017-05-02T01:14:52+5:30
महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील बुर्गी येथे नव्यानेच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा लाभ परिसरातील जनतेला होणार आहे.
उपकेंद्राचे रूपांतर : पदे भरून सुविधा पुरविण्याची मागणी
एटापल्ली : महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील बुर्गी येथे नव्यानेच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा लाभ परिसरातील जनतेला होणार आहे.
बुर्गी हे गाव एटापल्लीपासून बऱ्याच दूर अंतरावर आहे. वाहतुकीची साधने अत्यंत मर्यादित असल्याने रुग्णाला एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचविताना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य पथकाचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर करावे, अशी मागणी मागील १० वर्षांपासून केली जात होती. दोन वर्षांपूर्वी बुर्गीचे उपसरपंच रामा तलांडे यांनी मुख्यमंत्री बुर्गी आले असता त्यांना निवेदन दिले. यासर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. ई. राऊत, गेदाचे आरोग्य अधिकारी बी. एम. नरोटे, मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव छनीया, बुर्गीच्या सरपंच मिडकोबाई कोरसामी, उपसरपंच रामा तलांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीतच ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. वैभव छनीया हे काम पाहणार आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या मलेरिया, टायफाईड, सर्पदंश, गरोदर माता यांच्यासाठी सदर प्राथमिक आरोग्य केंद्र सोयीचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
१२ हजार लोकांना लाभ
बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात करपनफुंडी, कांदोळी, येमली, बिडरी, गटेपल्ली, उडेरा येथील उपकेंद्रांचा समावेश राहणार आहे. या परिसरात १२ हजार पेक्षा अधिक जनता असून या जनतेला आरोग्य केंद्राचा लाभ मिळणार आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रात गट अ चे दोन वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका चालक, आरोग्य सहायक (महिला/पुरूष), औषध निर्माता, लिपीक, चार एएनएम, शिपाई, स्विपर आदींची पदे मंजूर आहेत. यातील काही पदे रिक्त आहेत. सदर पदे भरून आरोग्य सुविधा पुरवाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.