२५ बंड्या तणस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:39 AM2021-04-09T04:39:00+5:302021-04-09T04:39:00+5:30
आरमाेरी येथील इंदिरानगर बर्डीतील शेतकरी आनंदराव सारवे, छगन भोयर यांच्या वाड्यातील जनावरांचा चारा अंदाजे २५ बंड्या तणस ...
आरमाेरी येथील इंदिरानगर बर्डीतील शेतकरी आनंदराव सारवे, छगन भोयर यांच्या वाड्यातील जनावरांचा चारा अंदाजे २५ बंड्या तणस शेतात ठेवली हाेती. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ढिगाला अचानक आग लागली. शेतकरी छगन भोयर, आनंदराव सारवे दुधाचा व्यवसाय करतात. यासाठी त्यांच्याकडे दुधाळ जनावरे आहेत. पावसाळ्यात जनावरांना चारा देण्यासाठी धानाची तणस त्यांनी जमा करून आपल्या घराशेजारी आणून ठेवली हाेती. तसेच भोयर व सारवे यांनी जीवानी राईस मिल ब्रम्हपुरी रोडच्या मागे असलेल्या वाड्यात अंदाजे एकूण २५ ते ३० बंड्या तणस आणून ठेवली होती. बुधवारी दुपारी तणसाच्या तीन ढिगांना आग लागली. आगीत सर्व तणस जळून खाक झाली. त्यामुळे शेतेकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. साेबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना चारा कुठून आणायचा, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.