३०० रूपयांत मिळणार जळाऊ बिट
By admin | Published: December 29, 2016 01:19 AM2016-12-29T01:19:12+5:302016-12-29T01:19:12+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना निस्तार हक्काने जळाऊ लाकूड ५१३ रूपये सवलतीच्या दराने विकल्या
शासनाचा निर्णय : कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश
देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना निस्तार हक्काने जळाऊ लाकूड ५१३ रूपये सवलतीच्या दराने विकल्या जात होते. निस्तार हक्काने अल्पभूधारक, शेतकरी, बीपीएलधारक व्यक्ती व अंत्यसंस्कारासाठी सर्वसामान्य नागरिकांना चढ्यादराने जळाऊ लाकूड घ्यावे लागत असल्याने आर्थिक भार सोसावा लागत होता. या संदर्भात आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी हा प्रश्न विधीमंडळात उपस्थित केला व त्यानंतर सातत्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. याची दखल घेत राज्य सरकारने २७ डिसेंबरला जळाऊ लाकूड बिट ३०० रूपयाला प्रतिबिट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात महसूल व वन विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. अतिदुर्गम आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना जिल्हाधिकारी यांच्याकडून जळाऊ लाकडाचा दर मंजूर करण्यात येत होता. मजुरी व वाहतुकीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जळाऊ लाकडाच्या दारात देखील झपाट्याने वाढ झाली. बिटाचे दर कमी केल्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होण्याच्या उद्देशाने वन विभागाची जनसामान्यात प्रतिमा उंचाविण्याच्या दृष्टीने वनालगतच्या गावातील लोकांना परवडेल, अशा दरात शासनाने जळाऊ बिट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. क्रिष्णा गजबे यांनी राज्याचे वित्त वन, नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यानंतर आ. गजबे यांनी विधी मंडळात तारांकित प्रश्नही या मुद्यावर उपस्थित केला होता. गजबे यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन राज्य शासनाने जळाऊ बिटाचे दर ३०० रूपये करण्यास मान्यता प्रदान केली आहे. यासंदर्भात राज्याच्या वन विभागाचे सहसचिव प्रकाश महाजन यांनी आदेश काढला आहे. या निर्णयाचा गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना मोठा लाभ होईल, असे आ. गजबे यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)