कोरचीत घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 11:48 PM2018-11-08T23:48:06+5:302018-11-08T23:48:26+5:30
येथील विश्वनाथ नागोजी मोहुर्ले यांच्या घराला बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत घर जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : येथील विश्वनाथ नागोजी मोहुर्ले यांच्या घराला बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत घर जळून खाक झाले.
आग लागलेले घर हे चाळीप्रमाणे असून या घरी चरणदास खोब्रागडे, अशोक करंजेवार, प्रदीप नंदेश्वर, राजू नेवारे, मोहन इरले आदी भाड्याने राहत होते. दिवाळी असल्याने सर्वच कुटुंब बाहेरगावी गेल्या होत्या. दुपारी ३ वाजताच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. घरातून धूर निघत असल्याचे नागरिकांना दिसल्यानंतर नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. महेश जांभूळकर यांच्या पत्नी घरात स्वयंपाक करीत होत्या. ओरडण्याचा आवाज आल्यानंतर त्या घराबाहेर पडल्या. काही प्रमाणात साहित्यही बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे साहित्य बचावले. मात्र इतर भाडेकरूंचे साहित्य जळून खाक झाले. नेमके किती रूपयांचे नुकसान झाले आहे, याचा निश्चित आकडा सांगता येत नसला तरी या घरात जवळपास १० भाडेकरू राहत होते. सर्वच भाडेकरू शासकीय कर्मचारी असल्याने प्रत्येकाच्या घरी टीव्ही, फ्रिज, अलमारी, गॅस, दागदागिणे, कपडे व इतर साहित्य होते. हे सर्व साहित्य जळाल्याने जवळपास ५० लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
आग लागल्याचे कळाल्यानंतर नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. आग लागल्याची माहिती कळताच पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफडे, नायब तहसीलदार ओके, माजी नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी, उपाध्यक्ष कमलनारायण खंडेलाल, नंदकिशोर वैरागडे यांच्यासह गावातील नागरिक व वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
नागरिकांनी मागच्या खिडक्या तोडून स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तरीही आठपैकी सात कर्मचाऱ्यांच्या खोलीतील साहित्य जळून खाक झाले. केवळ एका कर्मचाºयाचे साहित्य वाचले.