बांबूसाठी बुरुड कामगारांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:08 AM2021-03-04T05:08:47+5:302021-03-04T05:08:47+5:30
आरमोरी व देसाईगंज येथील जवळपास सहाशे बुरुड कामगार बांबूच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. बांबूपासून विविध उपयोगी वस्तू तयार करून ...
आरमोरी व देसाईगंज येथील जवळपास सहाशे बुरुड कामगार बांबूच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. बांबूपासून विविध उपयोगी वस्तू तयार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील वर्षभरापासून म्हणजे कोरोना लॉकडाऊनपासून या कामगारांना वनविभागाकडून हिरव्या बांबूचा पुरवठा करण्यात आलेला नाही .त्यामुळेच व्यवसाय ठप्प होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या कामगारांचे जीवन बांबूवर अवलंबून असल्याने कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा गंभीर त्यांच्यासमोर उभा आहे.
गडचिरोली जिल्ह्यात बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून, पेसाअंतर्गत वन समितीला बांबू काढण्याचे आणि विक्री करण्याचे हक्क दिले आहेत. वन समितीद्वारे जास्त किमतीने पेपर मिलला बांबू पाठविले जातात. त्यामुळेच या कामगारांना बांबू पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. वनविभागाने पेसा अंतर्गत मोडणारा बांबू बुरुड कामगारांकरिता १० टक्के राखीब ठेवावा याकरिता बुरुड समाज बहुद्देशीय विकास संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले; परंतु आजतागायत बांबू कामगारांच्या मागणीचा विचार करण्यात आलेला नाही. उपवनसंरक्षक व आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनाही वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र परिस्थिती जैसे थे. बांबूचा पुरवठा करावा, अशी मागणी बुरुड समाज बहुद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष मधुकर बोरकर, सचिव ज्ञानदेव हिरापुरे, दिलीप हिरापुरे, नेपाल नागपुरे, देवेंद्र हिरापुरे, नरेश हिरापुरे, चंद्रशेखर नागपुरे, सुशील बोरकर, गोमा गराडे, निशांत हिरापुरे आदींनी देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडे केली आहे.