बैलबंडीने आणावा लागला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:17 AM2018-01-11T00:17:28+5:302018-01-11T00:17:40+5:30
येथून दोन किमी अंतरावर असलेल्या पद्देवाही टोला येथील सुमन बाबुराव मडावी (४०) या महिलेचा मृतदेह बुधवारी घराजवळच्या विहिरीत आढळून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यासाठी पैसे नसल्याने वाहन मिळाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या पद्देवाही टोला येथील सुमन बाबुराव मडावी (४०) या महिलेचा मृतदेह बुधवारी घराजवळच्या विहिरीत आढळून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यासाठी पैसे नसल्याने वाहन मिळाले नाही. परिणामी तिच्या कुटुंबीयांनी स्वत:च्या बैलबंडीत मृतदेह टाकून रूग्णालयापर्यंत आणला. मात्र या ठिकाणीही शवविच्छेदन करणारे डॉक्टर नसल्याने सायंकाळी मृतदेह अहेरी रूग्णालयात हलवावा लागला.
एटापल्ली तालुका आदिवासी बहूल आहे. या तालुक्यातील बहुतांश नागरिक हातावर आणून पानावर खातात. एखादेवेळी अनुचित घटना घडल्यास मृतदेह दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी पैसे राहत नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा मृतदेह बैलबंडीने आणण्याची नामुष्की ओढवते. त्यामुळे एटापल्ली तालुक्याला विशेष बाब म्हणून शववाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. यापूर्वी तुमरगुंडा येथील एका इसमाला मुलाचे प्रेत खांद्यावर घरी न्यावे लागले होते.
शवविच्छेदनासाठी लागतात तीन दिवस
दुर्गम भागातील नागरिक घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे तक्रार करतात. पोलीस त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पंचनामा करतात. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली येथे आणला जातो. याही ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर नसल्यास मृतदेह अहेरीला हलवावा लागतो. या सर्व प्रक्रियेत तीन दिवस उलटून मृतदेहाची दुर्गंधी सुटते.