बसची झाडाला धडक, नऊ जखमी
By admin | Published: June 23, 2017 12:48 AM2017-06-23T00:48:58+5:302017-06-23T00:48:58+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून बसची झाडाला धडक बसली.
लभाणतांडानजीकची घटना : स्टेअरिंग लॉक झाल्याने घडला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून बसची झाडाला धडक बसली. या अपघातात बसमधील नऊ प्रवाशी जखमी झाले. सदर घटना आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील अहेरी तालुक्यातील लभानतांडा वळणावर गुरूवारी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास घडली.
एमएच-४०-वाय-५५८४ क्रमांकाची नागपूर आगाराची बस अहेरीवरून नागपूरसाठी अहेरी आगारातून दुपारी २.१५ वाजता निघाली. आलापल्लीपासून ४ किमी अंतरावर असलेल्या लभाणतांडा नजीकच्या वळणावर या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून बसची झाडाला जबर धडक बसली. नऊ प्रवाशी जखमी झाले. यामध्ये बसचालक एन. टी. टेंभरे (३५), बसवाहक विठ्ठल चव्हाण, प्रवाशी संदीप सिंग (३६) रा. हरियाणा, रंजना आलाम (३०), वसंत वलके (५८) रा. अहेरी, पर्वता चिट्टलवार (४०) रा. विठ्ठलवाडा, पोशक्का काटलू (८०) रा. सिरोंचा, लस्मय्या काटलू, माया टिपले रा. आलापल्ली आदींचा समावेश आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिवेंद्र कटरे हे घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. सर्व जखमींना सदर रुग्णवाहिकेने अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय उमाटे, डॉ. दीपक मुंडे यांनी जखमींवर उपचार केले. यापैकी पोशक्का काटलू यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोलीच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अहेरीचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी रुग्णालयात जाऊन सर्व जखमींची भेट घेतली.
बसचालक एन. के. टेंभरे यांनी प्रसंगावधान राखल्याने बसमधील प्रवाशी बचावले. धावत्या बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यावर वेग कमी करून त्यांनी लभाणतांडाजवळ बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात बस न उलटता झाडावर आदळली. अहेरी आगाराचे लिपीक वामन चिप्पावार व चरण चहारे यांनी अहेरीच्या रुग्णालयात येऊन जखमी प्रवाशांची भेट घेतली. सर्व जखमींना एक हजार रूपयांची आर्थिक मदत महामंडळामार्फत करण्यात आली. या घटनेचा तपास सुरू आहे.