दुर्गम भागात बससेवा प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:33 PM2017-12-03T22:33:33+5:302017-12-03T22:33:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा/गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरील्ला आर्मी) स्थापना दिनानिमित्त २ डिसेंबरपासून सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहापूर्वी नक्षलवाद्यांनी धानोरा, कोरची तालुक्यासह अहेरी उपविभागात ठिकठिकाणी पत्रके टाकून हा बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. सदर सप्ताहाचा पहिल्या दिवशी शनिवारला एटापल्ली, कोरची तालुक्यात प्रभाव आढळून आला. दुसºया दिवशी रविवारला संपूर्ण धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात तसेच अहेरी उपविभागाच्या दुर्गम गावांमध्ये नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाचा परिणाम काही अंशी दिसून आला. रविवारी धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक बसफेºया प्रभावित झाल्या होत्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पीएलजीए सप्ताहादरम्यान गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या ग्रामीण भागातील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा तसेच खासगी वाहतुकही बंद होती. महामंडळाची गडचिरोली-गोडलवाही ही बसफेरी धानोरापर्यंत पोहोचली. तसेच गडचिरोली-खांबाळा बसफेरी धानोरापर्यंत धावली. गडचिरोली-कोटगुल ही बसफेरी मुरूमगावपर्यंत तर गडचिरोली-मानपूर ही बस फक्त धानोरापर्यंत सुरू आहे. खांबाळा मार्गावर महामंडळाची बस व खासगी वाहतूक पूर्णत: बंद आहे. गडचिरोली आगारातून गडचिरोली-कारवाफा-पेंढरी ही बसफेरी सोडली जाते. मात्र नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहादरम्यान रविवारी ही बसफेरी गडचिरोली येथून कारवाफा-पेंढरीपर्यंत पोहोचली. मात्र ही बस पेंढरीच्या पुढे धावली नाही. घोटपर्यंत महामंडळाच्या बसफेºया सुरू असल्या तरी घोटपुढे जाणाºया ग्रामीण भागात महामंडळाची बस वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. सदर सप्ताहादरम्यान मात्र छत्तीसगड राज्यातून धानोरा मार्गे गडचिरोली जिल्ह्यात चालणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स रविवारी वाहतुकीवर सुरू होत्या.
अहेरी उपविभागासह कोरची, कुरखेडा तालुक्यात तसेच भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागात पीएलजीए सप्ताहादरम्यान नक्षली दहशत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली शेतीतील कामे काही प्रमाणात थांबविली आहे.