रस्त्याच्या दुरवस्थेने बससेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:38 PM2018-09-03T22:38:47+5:302018-09-03T22:39:03+5:30
तालुक्यातील मन्नेराजाराम-भामनपल्ली या मार्गाचे १० ते १२ वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेकदा सदर मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात मुरूम व गिट्टी टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र वाहनाच्या वर्दळीने व पावसामुळे सदर मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील मन्नेराजाराम-भामनपल्ली या मार्गाचे १० ते १२ वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेकदा सदर मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात मुरूम व गिट्टी टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र वाहनाच्या वर्दळीने व पावसामुळे सदर मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सदर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद झाली आहे. परिणामी मन्नेराजाराम परिसरातील शेकडो नागरिकांना दररोज खासगी वाहनाद्वारे याच खडतर मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
सद्य:स्थितीत मन्नेराजाराम-भामनपल्ली या डांबरी मार्गाची अवस्था खडीकरण मार्गासारखी झाली आहे. डांबरीकरण उखडल्यानंतर दुरूस्तीदरम्यान येथे डांबर टाकायला पाहिजे होते. मात्र मुरूम व गिट्टी तसेच मातीची मलमपट्टी करून कशीबशी या मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली. गेल्या १० वर्षात सदर मार्गाची एकदाही पक्की दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे सदर मार्गावर खड्ड्यांची आरास निर्माण झाली आहे. परिसरातील २० गावातील नागरिक याच मार्गाने आवागमन करतात. भामरागड तालुका मुख्यालयापासून ३२ किमी अंतरावरील ताडगावापासून २० किमी अंतर मन्नेराजाराम गावाचे आहे. जड वाहनांचे आवागमन नसताना सुध्दा मन्नेराजाराम मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्ता दुरूस्तीची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्यानंतर मुरूम व गिट्टी टाकून गतवर्षी या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली. त्यानंतर महामंडळाची बससेवा सुरू झाली. त्यानंतर डांबरी पॅचेस टाकून रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र काम सुरू करण्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी या कामाला विरोध करीत डांबराचे ड्रम जाळून टाकले. तेव्हापासून रस्ता दुरूस्तीच्या कामाकडे प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.
मन्नेराजाराम-भामनपल्ली मार्गावर बससेवा सुरू होती. २० नागरिकांचा या मार्गावरून प्रवास सुरू होता. परंतु १५ आॅगस्टपासून रस्त्याच्या दुरवस्थेच्या कारणावरून महामंडळाची बसफेरी बंद झाली. सदर मार्गावरील खड्डे बुजविणे आवश्यक आहे. रस्ता दुरूस्तीबाबतचा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पारीत करण्यात आला आहे. सदर ठराव पालकमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील नागरिकांचा खडतर प्रवास सुरू आहे. सदर गंभीर समस्येकडे जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी लक्ष घेऊन सदर मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.
- रंगय्या मडावी,
सरपंच, मन्नेराजाराम, ता.भामरागड