बस-ट्रॅक्टरची टक्कर, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:13 AM2019-03-08T00:13:55+5:302019-03-08T00:14:16+5:30
चामोर्शी येथील मार्कंडेश्वराच्या यात्रेवरून परतणारा भाविकांचा ट्रॅक्टर आणि एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात घोट ते रेगडी मार्गावर माडेआमगाव क्रॉसिंग समोरील वळणावर घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : चामोर्शी येथील मार्कंडेश्वराच्या यात्रेवरून परतणारा भाविकांचा ट्रॅक्टर आणि एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात घोट ते रेगडी मार्गावर माडेआमगाव क्रॉसिंग समोरील वळणावर घडला. याच बसने रेगडीपासून एक किमी अंतरावर एका गायीला धडक दिल्याने ती गाय ठार झाली. सदर घटना बुधवारला रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात अरुण मट्टामी (१५) व सुनील कुलेटी (१६) दोन्ही रा. देवदा हे गंभीर जखमी झाले. याशिवाय ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
गडचिरोली आगाराची एम.एच.०७, सी ९३२० क्रमांकाची गडचिरोली- विकासपल्ली ही बस विकासपल्लीवरून घोटकडे परत येत होती तर विरुद्ध दिशेने मार्कंडाच्या यात्रेवरून परत देवदाकडे यात्रेकरू ट्रॅक्टरने जात होते. ट्रॅक्टर क्र. एमएच ३३ एफ ४७३२ व ट्रॉली क्रमांक एमएच ३३ जी ४०५७ या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसने धडक दिली. ट्रॉलीमध्ये १२ ते १५ जण बसले होते तर बसमध्ये सुद्धा तीन प्रवासी होते. यात ट्रॅक्टर मधील अरुण मट्टामी व सुनील कुलेटी हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आले.
बसचालक हा दारूच्या नशेत गाडी चालवित असल्याची चर्चा अपघातस्थळी होती. हा अपघात होण्याअगोदर रेगडीपासुन १ किमी अंतरावर स्मशानभूमीजवळ या बसने एका गायीला धडक देऊन ठार केले. तसेच ट्रॅक्टरला धडक देऊन बस ३०० मीटर दूर जंगलात गेली. यात बसचे ब्रेक फेल झाल्याचे समजते. सदर घटनेची तक्रार रेगडी पोलीस मदत केंद्रात दाखल केली असून पुढील तपास रेगडी पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक धनजी खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयराम तिम्मा करीत आहेत.