वैरागडात बोगस डॉक्टरांचा धंदा जाेमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:33 AM2021-05-22T04:33:38+5:302021-05-22T04:33:38+5:30
वैरागडात बोगस डॉक्टरांचा धंदा जाेमात वैरागड : ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण शासकीय रुग्णालयात न जाता घराेघरी पाेहाेचून ...
वैरागडात बोगस डॉक्टरांचा धंदा जाेमात
वैरागड : ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण शासकीय रुग्णालयात न जाता घराेघरी पाेहाेचून उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेतात. हे बोगस डॉक्टर आपले खिसे गरम करून घेण्यासाठी या रुग्णांना कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला देत नाहीत. उलट आपले खिसे गरम हाेईपर्यंत नाममात्र उपचार करीत असतात. वैरागडसह परिसरात असे अनेक बोगस डॉक्टर आहेत. नाममात्र उपचारामुळे रुग्णांचा जीव धाेक्यात आहे. त्यामुळे बाेगस डाॅक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वैरागडसह परिसरातील गावांमधून अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येतात. विशेष म्हणजे, येथे एक सेवानिवृत्त कर्मचारी बोगस डॉक्टर बनून घरोघरी पोहोचून रुग्णांवर उपचार करतो. याशिवाय काहीजण दवाखाने उघडून बसले आहेत. अशा बाेगस डाॅक्टरांच्या वैद्यकीय शिक्षण पात्रतेची तपासणी करावी, अशी मागणी मागील वर्षात झाली होती; परंतु आरमोरीच्या तालुका आराेग्य अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने रुग्णांच्या जिवाशी आजही खेळ सुरू आहे. कोरोना तपासणीच्या भीतीने सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण तपासणी अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांचे फावले आहे. रुग्णांकडून माेठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात आहे. सदर बाेगस डाॅक्टरांकडून रुग्णांच्या जिवाला धाेका असल्याने त्यांच्या वैद्यकीय शिक्षण पात्रतेची तपासणी करून रुग्णसेवा बंद करावी किंवा अशा बाेगस लाेकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कारवाई झाल्यास रुग्ण आपाेआप शासकीय रुग्णालयात जातील व काेराेना संसर्गाची साखळी ताेडता येईल, असे वैरागड येथील नागरिकांचे म्हणणे आहे