मोहफूल संकलनासाठी एक लाखाचे बिज भांडवल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:58 PM2019-01-14T12:58:12+5:302019-01-14T12:59:25+5:30
मोहफूल संकलन करणाऱ्या वनव्यवस्थापन समित्यांना बिज भांडवल म्हणून प्रती समिती एक लाख रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मोहफूल संकलन करणाऱ्या वनव्यवस्थापन समित्यांना बिज भांडवल म्हणून प्रती समिती एक लाख रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. गडचिरोलीसह पाच जिल्ह्यातील ६२ वन व्यवस्थापन समित्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.
विदर्भातील जंगलात मोहफुलाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मोहफूल हे औषधी गुणधर्म असलेले फूल आहे. मोहफुलापासून खाण्याचे विविध पदार्थ बनविले जात आहेत. सदर पदार्थ चविष्ट असल्याने दिवसेंदिवस या पदार्थांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे मोहफुलाचीही मागणी वाढून मोहफुलाला चांगली किंमत मिळत आहे. तसेच ग्रामीण जनतेला रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मोहफूल संकलन, साठवणूक, मुल्यवर्धन व विपणन याकडे वन विभागाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
मोहफूल संकलनाला वाव मिळावा, यासाठी मोहफुलांचे संकलन करणाºया संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना प्रत्येकी एक लाख रूपयांचे बिज भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वन विभागातील १०, चंद्रपूर वन विभागातील ५, धुळे वनवृत्तातील मेवासा वन विभागातील २०, अमरावती वन विभागातील २६ व गोंदिया वन विभागातील एका वन व्यवस्थापन समितीला बिज भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. याच वन व्यवस्थापन समित्यांना प्रत्येकी २०० नग याप्रमाणे ग्रीन नेट जाळी उपलब्ध करून दिली जाणार. चंद्रपूर व गोंदिया येथे प्रत्येकी २५ लाख रूपये खर्चून शीतगृह बांधून दिले जाणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
आदिवासींना मिळणार प्रशिक्षण
मोहफुलांपासून विविध चविष्ट पदार्थ बनविणे शक्य आहे. हे पदार्थ तयार केल्यास दुर्गम भागातील आदिवासी जनतेला रोजगारीचे साधन उपलब्ध होईल. तसेच मोहफुलाचे मूल्यवर्धन होऊन अधिकची किंमत मिळेल. या उद्देशाने वन विभाग आदिवासी नागरिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार आहे. गोंदिया येथे ५२ लाख रूपये खर्चून वनवृत्तस्तरावर प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे.