व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:20 PM2019-03-20T22:20:37+5:302019-03-20T22:21:00+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात दिवाळीपूर्वी वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या अनेक भागात धान खरेदी केंद्र सुरू केले नव्हते. दरम्यान आपली आर्थिक अडचण भागविण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळी खासगी व्यापाऱ्याला आपला धान विकला.

Businessmen and farmers | व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये जुंपली

व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये जुंपली

Next
ठळक मुद्देसातबाराचा सर्रास वापर : शेतकऱ्यांच्या नावावर धान विकलेल्या व्यापाऱ्यांना हवा बोनसचा वाटा

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात दिवाळीपूर्वी वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या अनेक भागात धान खरेदी केंद्र सुरू केले नव्हते. दरम्यान आपली आर्थिक अडचण भागविण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळी खासगी व्यापाऱ्याला आपला धान विकला. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान दोन महिन्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाराचा वापर करून आविका संस्थेच्या केंद्रांवर विकला. आता बोनसच्या रकमेवरून व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये कलगीतुरा निर्माण झाला आहे. तो धान आम्ही विकल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यात जमा होणारे बोनस आम्हाला द्यावे अशी अपेक्षा व्यापारी करीत आहेत.
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आविका संस्थांमार्फत दरवर्षी आधारभूत खरेदी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. हंगामाच्या सुरूवातीला महामंडळाच्या वतीने धान खरेदी केंद्र प्रस्तावित केले जातात. दरम्यान धान केंद्र मंजूर करण्याची प्रशासकीय कार्यवाही पार पडण्यास विलंब होतो. परिणामी महामंडळाकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यास दोन महिन्याचा विलंब होत असतो. नेमक्या याच काळात अल्पमुदतीच्या धानाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येते. आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यावेळी मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना आपला धान विकून टाकला. आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केल्यास संबंधित शेतकऱ्याला क्विंटलमागे २०० रुपयांचा बोनस मिळत असतो. मात्र विद्यमान राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वी बोनसच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस आता दिला जात आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा वापरून आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केली. या धानाचा बोनस वाढीव रकमेनुसार संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. व्यापाऱ्याकडे धान विक्री केल्याने आपले आर्थिक नुकसान झाले, ही बाब लक्षात आल्यावर अनेक शेतकरी व्यापाऱ्यांकडे बोनसच्या वाढीव रकमेसाठी तगादा लावत आहेत. विशेष म्हणजे, अनेक खासगी व्यापाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याचा सातबारा वापरून दोन महिन्याच्या अंतराने महामंडळाच्या केंद्रावर साठा केलेल्या धानाची विक्री केली.
वाढीव रकमेवर शेतकऱ्यांचाच हक्क
बोनसच्या स्वरूपात धानावर क्विंटलमागे मिळालेले वाढीव ३०० रुपयावर आमचा हक्क आहे, तो तुम्हाला देणार नाही, असा प्रस्ताव अनेक शेतकरी संबंधित व्यापाऱ्यांकडे ठेवत आहेत. सदर रक्कम न मिळाल्यास आमच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम विड्रॉल करून देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे. या वादामुळे अनेक व्यापाऱ्यांची आता गोची झाली आहे.

Web Title: Businessmen and farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.