महामंडळाकडून २० लाख क्विंटलची धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:55 AM2018-12-20T00:55:20+5:302018-12-20T00:56:58+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत खरीप पणन हंगाम २०१८-१९ मध्ये आधारभूत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात धानाची खरेदी सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाने आविका संस्थांच्या माध्यमातून एकूण २४ कोटी ६२ लाख ७२ हजार १८० रूपये किमतीच्या २० लाख १ हजार ६६६ क्विंटल इतक्या धानाची खरेदी ६५ वर केंद्रावरून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत खरीप पणन हंगाम २०१८-१९ मध्ये आधारभूत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात धानाची खरेदी सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाने आविका संस्थांच्या माध्यमातून एकूण २४ कोटी ६२ लाख ७२ हजार १८० रूपये किमतीच्या २० लाख १ हजार ६६६ क्विंटल इतक्या धानाची खरेदी ६५ वर केंद्रावरून केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. यापैकी ४३ केंद्रावर धानाची आवक झाल्याने येथे धान खरेदी करण्यात आली. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मंजूर ३५ पैकी २७ केंद्रांवर धानाची आवक झाली आहे. गडचिरोली उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ४३ केंद्रांवरून आतापर्यंत एकूण ३० कोटी ३१ लाख ५९ हजार ७०५ रूपये किमतीच्या १ लाख ७३ हजार ६११ इतक्या क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. सदर धान एकूण ५ हजार ८६० शेतकऱ्यांनी महामंडळाच्या केंद्रावर विकला. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयंतर्गत ४ कोटी ८९ लाख ५६ हजार रूपये किमतीच्या २७ हजार ९७४ इतक्या क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. गडचिरोली उपप्रादेशिक कार्यालयाने धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ६ कोटी ६६ लाख ६३ हजार ६४२ हजार रूपयांचे धान चुकारे अदा केले आहे. अद्यापही २३ कोटी ७२ लाख ९६ हजार रूपयांचे धान चुकारे शिल्लक आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत २७ केंद्रांवर शेतकºयांनी धान आणून विक्री केली. मात्र यातील एकाही शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले नाही. अद्यापही ७४२ शेतकऱ्यांचे ४ कोटी ८९ लाख ५६ हजार रूपयांचे धान चुकारे शिल्लक आहे. धान चुकाºयाची प्रक्रिया आॅनलाईन व किचकट स्वरूपाची असल्याने शेतकऱ्यांच्या हातात रक्कम पडण्यासाठी १५ ते २० दिवसांचा विलंब होत असतो. या उलट खासगी व्यापारी चार ते पाच दिवसात धानाचे चुकारे अदा करतात. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेले अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्याला धानाची विक्री करतात. बारदान्याच्या तुटवड्यामुे काही केंद्रावर काही दिवस धान खरेदीची प्रक्रिया प्रभावित झाली होती.
धानाची सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाने अधिनस्त असलेल्या कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट या उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दितील सर्वच ४३ धान खरेदी केंद्रांशी संबंधित आविका संस्थांना खरेदी केलेल्या धानाची सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. या संदर्भाचे लेखी पत्र तीन दिवसांपूर्वीच उपप्रादेशिक व्यवस्थापकांसह आविका संस्थांच्या पदाधिकारी व व्यवस्थापकांना पाठविण्यात आले आहे.
चार दिवसांपासून धान खरेदी बंद
रविवारपासून बुधवारपर्यंत ढगाळी वातावरण कायम असून दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला. महामंडळ व आविका संस्थांकडे असलेली गोदामे खरेदी केलेल्या धानाने पूर्णत: भरली आहेत. ढगाळी वातावरणापूर्वी उघड्यावर धान खरेदी केली जात होती. मात्र गोदाम फुल्ल झाल्याने अनेक आविका संस्थांच्या केंद्र परिसरात ताडपत्री झाकून खरेदी केलेले धान ठेवावे लागत आहे. आता धान साठवणुकीसाठी व्यवस्था नसून उघड्यावर धान खरेदी केल्यास नुकसानीची दाट शक्यता असल्याने बहुतांश आविका संस्थांनी गेल्या चार दिवसांपासून धान खरेदीची प्रक्रिया बंद ठेवली आहे. काही मोजक्या केंद्रावर गोदाम व धान साठवणुकीची सुविधा असलेल्या ठिकाणी बुधवारी धान खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.