दीड लाख क्विंटल धानाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:22 AM2017-12-21T00:22:55+5:302017-12-21T00:23:37+5:30
जिल्ह्यात यावर्षी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत आतापर्यंत जवळपास दिड लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. २९ कोटींच्या या धानापैकी जवळपास १५ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत आतापर्यंत जवळपास दिड लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. २९ कोटींच्या या धानापैकी जवळपास १५ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील १९ खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाहीत. ते पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत.
खरीप हंगामातील धानाची कापणी होऊन बहुतांश भागात मळणीही आटोपत आली आहे. दक्षिण गडचिरोली भागातल्या सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी आणि मुलचेरा या पाच तालुक्यातील ३४ पैकी १९ खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाहीत. याशिवाय मार्केटिंग फेडरेशनचे ४ खरेदी केंद्र सुरू व्हायचे आहेत. जिल्हाभरातील एकूण १०१ मंजूर खरेदी केंद्रांपैकी ७८ केंद्र सुरू झाले आहेत.
आदिवासी विकास महामंडळाचे जिल्हाभरात सर्वाधिक ८६ केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५२ केंद्र असून ते सर्वच केंद्र सुरू झाले आहेत. मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदीसाठी १५ केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी ११ केंद्र सुरू असून चार केंद्र गोदाम उपलब्ध झाले नसल्यामुळे अद्याप सुरू झालेले नाहीत. मार्केटिंग फेडरेशन खरेदी केलेला सर्व धान गोदामातच ठेवते हे विशेष. गोदामाची व्यवस्था होईपर्यंत धानाची खरेदी सुरूच केली जात नाही.
विशेष म्हणजे यावर्षी ‘ए’ ग्रेडचा धान अद्याप कोणत्याही केंद्रावर आलेला नाही. खरेदी केलेला संपूर्ण धान साधारण ग्रेडचा आहे. आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांना ९ कोटी ४४ लाख ४० हजार रुपयांचे चुकारे केले आहे तर मार्केटिंग फेडरेशनने ५ कोटी ५३ लाख ५२ हजार रुपयांचे चुकारे दिले आहेत.
आठ केंद्रांवर आवकच नाही
अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ३४ केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी १५ केंद्र सुरू झाले आहेत. मात्र ८ केंद्रांवर अद्याप शेतकºयांनी धानच आणलेला नाही. त्यात मुलचेरा तालुक्यातील इंदाराम, आलापल्ली व पेरमिली, मुलचेरा तालुक्यातील मुलचेरा, सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, भामरागड तालुक्यातील ताडगाव आणि कोठी तसेच एटापल्ली तालुक्यातील गेंदा व जाराबंडी या केंद्रांचा समावेश आहे. या भागात उशिरा धान निघत असल्यामुळे ही परिस्थिती असून पुढील आठवड्यात उर्वरित १९ केंद्र सुरू होतील, असे अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक मुलेवार यांनी सांगितले.
यावर्षीही धान उघड्यावर
आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान सध्या संस्था, ग्रामपंचायती, कृषी विभाग आणि शासकीय गोदामांमध्ये साठवून ठेवला आहे. या गोदामांत ८० ते ९० हजार क्विंटल धान आहे. मात्र उर्वरित जवळपास ५० हजार क्विंटल धान उघड्यावरच आहे. यापुढे खरेदी होणारा धानही उघड्यावरच राहणार आहे.
भरडाईसाठी ४९ प्रस्तावांना मंजुरी
धानाच्या भरडाईसाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ४९ राईस मिलर्सचे प्रस्ताव आदिवासी विकास महामंडळाकडे आले आहेत. त्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून करारनामे होताच धानाच्या भरडाईला सुरूवात होणार आहे. महामंडळाकडे धान साठविण्यासाठी पुरेशा प्रमाणात गोदामे नसल्यामुळे उघड्यावरच धान ठेवावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर भरडाईला सुरूवात होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.