दुसऱ्यांचा संसार सावरून आम्ही भागविताे आपली उपजीविका, ओझा गाेंड समाजाची व्यथा
By गेापाल लाजुरकर | Published: May 7, 2023 04:58 PM2023-05-07T16:58:52+5:302023-05-07T17:00:42+5:30
गडचिरोली तालुक्यांच्या गोविंदपूर येथे ओझा गोंड आदिवासी समाजाचे लोक राहतात. टिनाच्या पत्र्यांपासून संसाराेपयाेगी विविध साहित्य तयार करणे हा मुख्य व्यवसाय आहे.
गडचिराेली : पिढ्यान् पिढ्यांपासून केल्या जाणाऱ्या पारंपरिक व्यवसायाला आता काही प्रमाणात खीळ बसली असली तरी काही जाती-जमाती अजूनही भटकंती करून आपला पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. काहींचे व्यवसाय डबघाईला आले आहेत. अशातच ओझा गाेंड समाजाचे लाेक अजूनही पिंप, टिन व अन्य लाेखंडी वस्तूंपासून विविध वस्तू तयार करतात. गडचिराेली तालुक्यातील गाेविंदपूर येथील मूळ रहिवासी असलेले ओझा गाेंड समाजबांधव विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाळा साेडून वर्षभर स्थलांतर करतात. संसाराेपयाेगी विविध वस्तू पैशांच्या माेबदल्यात देऊन दुसऱ्यांचा संसार सावरून आम्ही आपली उपजीविका भागवित असल्याची व्यथा समाजबांधवांनी व्यक्त केली.
गडचिरोली तालुक्यांच्या गोविंदपूर येथे ओझा गोंड आदिवासी समाजाचे लोक राहतात. टिनाच्या पत्र्यांपासून संसाराेपयाेगी विविध साहित्य तयार करणे हा मुख्य व्यवसाय आहे. पावसाळ्याचे दिवस वगळता इतर सर्व महिने गावोगावी भटकंती करून टिनपत्र्यांपासून संसाराेपयोगी साहित्य तयार करण्याचा व्यवसाय सुरू असतो. यातून या समाजाला रोजगार मिळताे. टिनपत्रे व टाकाऊ पिंपांपासून ड्रम, कोटी, सूप, चाळणी, कचरा दाणी आदी वस्तू तयार करतात. या वस्तू बनविण्यापोटी ते लाेकांकडून तांदूळ, डाळ व पैशांच्या स्वरुपात माेबदला घेतात. गडचिराेलीसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातील गावात दिवाळीनंतर ओझा गोंड समाजाचे लोक काही दिवसांसाठी अस्थायी स्वरुपात वास्तव्य करून हा व्यवसाय करतात.
आर्थिक स्थिती हलाखीची, पण सुविधा मिळेना
ओझा गाेंड समाजाची आर्थिक स्थिती हलाखीची असतानासुद्धा शासनाकडून सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे या समाजाची स्थिती आणखी बिकट हाेत आहे. जिल्हाबाहेर स्थलांतर करून अस्थायी व्यवसाय करून व जीवावर बेतणारे खेळ करून उपजीविका करतात, अशी व्यथा गुरूदास ताराचंद्र उईके, लवकुश मडावी, संदीप उईके, विजय उईके आदींनी मांडली.