उपकेंद्राचे कुलूप तोडूून गर्भवती महिलेला केले भरती
By admin | Published: March 13, 2017 01:17 AM2017-03-13T01:17:05+5:302017-03-13T01:17:05+5:30
तालुक्यातील नवेगाव येथील गर्भवती महिलेला भरती करण्यासाठी प्राथमिक आरोेग्य उपकेंद्रात घेऊन गेल्यानंतर
नवेगावातील प्रकार : परिचारिकांनी तातडीने पोहोचून केली प्रसूती
अहेरी : तालुक्यातील नवेगाव येथील गर्भवती महिलेला भरती करण्यासाठी प्राथमिक आरोेग्य उपकेंद्रात घेऊन गेल्यानंतर तेथील परिचारिका उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याने दगडाने सदर उपकेंद्राचे कुलूप तोडून गर्भवती महिलेस या उपकेंद्रात भरती केले. परिचारिकांशी संपर्क साधल्यानंतर तातडीने पोहोचून परिचारिकांनी सुखरूपरित्या महिलेची प्रसुती केली.
नवेगाव येथील आरोग्य उपकेंद्रात दोन परिचारिका कार्यरत आहेत. उपकेंद्रांतर्गत गावातील लोकसंख्या अधिक असल्यामुळे या उपकेंद्रात दरवर्षी ८० ते ९० प्रसुती होतात. एका गर्भवती महिलेला रविवारी प्रसुतीच्या कळा सुरू झाल्याने तिला तातडीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. यावेळी एक परिचारिका सकाळीच आलेल्या गरोदर मातेला घेऊन अहेरी येथे गेल्याची माहिती आहे. तर दुसरी परिचारिका सकाळी १० वाजता आलापल्ली येथून निघाली होती. यामुळे उपकेंद्रात कुणीच हजर नव्हते. गर्भवती महिलेला त्रास अधिक होत असल्याचे बघून गावातील सामाजिक कार्यकर्ते उमेश मोहुर्ले यांनी उपकेंद्राचे कुलूप तोडून गर्भवती महिलेला उपकेंद्रात भरती केले. लगेच दोन्ही परिचारिकांशी भमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही परिचारिका तत्काळ उपकेंद्रात दाखल झाल्या. त्यांनी तातडीने महिलेवर उपचार सुरू करून सुखरूपरित्या प्रसुती केली. (तालुका प्रतिनिधी)