सी-६० कमांडोने नेपाळमध्ये फडकाविला महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 08:02 PM2019-12-10T20:02:45+5:302019-12-10T20:02:54+5:30
नक्षलविरोधी अभियान राबविताना अनेक संकटांचा सामना करणा-या गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडोंच्या अनेक वीरगाथा नेहमीच ऐकायला आणि वाचायला मिळतात.
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविताना अनेक संकटांचा सामना करणा-या गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडोंच्या अनेक वीरगाथा नेहमीच ऐकायला आणि वाचायला मिळतात. पण त्यातील बाईक रायडर असलेले नायक पोलीस शिपाई किशोर खोब्रागडे यांनी आता ३५०० किलोमीटरचा खडतर प्रवास आपल्या बाईकने अवघ्या १२ दिवसांत पूर्ण करून नवीन विक्रम घडविला आहे. एवढेच नाही तर नेपाळमध्ये महाराष्ट्र आणि गडचिरोली पोलिसांचा ध्वज फडकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
सन २००७पासून गडचिरोली पोलीस दलात असलेल्या खोब्रागडे यांनी २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये १३ दिवसांत २४०० किलोमीटरचा खडतर प्रवास बाईकने पूर्ण केला होता. अतिशय थंड हवामानाच्या प्रदेशातील खारडोंगला मार्ग (१८,३८० फूट), तागलंगला मार्ग (१७,५८२ फूट), चांगला रस्ता (१७,५६६ फूट) ही ठिकाणं अवघ्या १३ दिवसात पूर्ण केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये भूतानमधील उंच शिखरावर बाईकने गेले होते. यावर्षी ते २५ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीवरून नेपाळसाठी रवाना झाल्यानंतर काठमांडू, कमलमाई, जनकपूर असा प्रवास पूर्ण करत त्यांनी पोखरा (नेपाळ) येथे पॅराग्लायडिंग केले. यावेळी तेथील आकाशात महाराष्ट्र पोलीस दल आणि सी-६० कमांडोजचा ध्वज अभिमानाने फडकविला. युवकांसाठी प्रेरणादायी ठरणा-या किशोर खोब्रागडे यांच्या जिद्द व चिकाटीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले.
‘नो ड्रग, नो वॉर’
किशोर खोब्रागडे यांनी आपल्या या बाईक रायडिंगची थिम ‘नो ड्रग, नो वॉर’ (अंमली पदार्थ नको आणि युद्ध नको) अशी ठेवली होती. नेपाळपर्यंतच्या प्रवासादरम्यान काही शाळांमध्ये जाऊन त्यांनी याचा प्रचारही केल्याचे खोब्रागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच पॅराग्लायडिंग गडचिरोलीतील शहीद जवानांना समर्पित केल्याचे ते म्हणाले.