सी-60 पथकाने नक्षल्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला, २६ नक्षलवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 07:13 AM2021-11-15T07:13:09+5:302021-11-15T07:13:47+5:30

प्रथमच एकावेळी २६ नक्षल्यांचा वेध, आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई

C-60 Squad reversed Naxals' innings on them, eliminating 26 Naxals | सी-60 पथकाने नक्षल्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला, २६ नक्षलवाद्यांचा खात्मा

सी-60 पथकाने नक्षल्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला, २६ नक्षलवाद्यांचा खात्मा

googlenewsNext
ठळक मुद्दे२२ एप्रिलच्या चकमकीदरम्यान रात्रीच्या अंधारात इंद्रावती नदी पार करून छत्तीसगडकडे पळ काढण्याच्या प्रयत्नात काही नक्षलवाद्यांनी नदीपात्रात उड्या मारल्या; पण नदी पार करून पैलतीर गाठणे त्यांना शक्य झाले नाही. 

मनोज ताजने

गडचिरोली : नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांकडून योजना आखणे सुरू होते; पण त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवत गडचिरोलीच्या सी-६० कमांडोंनी शनिवारी केलेली आक्रमक चढाई नक्षल्यांसाठी मोठा झटका ठरली आहे. विशेष म्हणजे एकाच चकमकीत २६ नक्षलवादी मारले जाण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली आहे. त्यामुळे पोलिसांचे सी-६० कमांडो पथक पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाले आहे.

धानोरा उपविभागांतर्गत गॅरापत्ती पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत, कोरची तालुक्यातील मदीनटोला जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे शिबिर लागले असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून पोलिसांना मिळाली होती. विशेष म्हणजे त्यात नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे हासुद्धा असण्याची शक्यता असल्यामुळे सी-६० कमांडो आणि विशेष कृती दलाच्या मिळून जवळपास ३०० कमांडोंनी शुक्रवारच्या रात्रीपासूनच शोधमोहीम सुरू केली होती. शनिवारच्या सकाळी चकमकीला सुरुवात झाली.

नक्षल्यांकडून गोळीबार करून पोलिसांना आपल्याकडे येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुरू होता; पण सी-६० पथकाने जिवाची बाजी लावत नक्षल्यांच्या दिशेने आगेकुच सुरूच ठेवली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ही चकमक सुरूच होती. सतत इतका वेळ चालत राहिलेली ही पहिलीच चकमक ठरली आहे, हे विशेष. यापूर्वी २२ ते २५ एप्रिल २०१८ यादरम्यान भामरागड तालुक्यातील कसनासूर-बोरिया, नैनेरच्या जंगलात दोन वेळा झालेल्या चकमकीनंतर ३९ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले होते. त्या चकमकीनंतर पहिल्या दिवशी १६ मृतदेह हाती लागले होते. त्यानंतर दोन मृतदेह सापडले. याशिवाय दोन दिवसांनंतर १५ मृतदेह इंद्रावती नदीच्या पात्रात सापडले होते. त्या मृतदेहांचा मगरींनी आणि मासोळ्यांनी फडशा पाडला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू पोलिसांच्या गोळीने झाला की, नदीत बुडून, हे स्पष्ट होऊ शकले नाही. २२ एप्रिलच्या चकमकीदरम्यान रात्रीच्या अंधारात इंद्रावती नदी पार करून छत्तीसगडकडे पळ काढण्याच्या प्रयत्नात काही नक्षलवाद्यांनी नदीपात्रात उड्या मारल्या; पण नदी पार करून पैलतीर गाठणे त्यांना शक्य झाले नाही. 

nअत्यंत विपरीत परिस्थितीत, जंगलात नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी १९९२ मध्ये 
सी-६० (कमांडे ६०) या विशेष प्रशिक्षित पोलिसांच्या पथकाची निर्मिती केली. 
nगडचिरोली तत्कालीन पोलीस अधीक्षक के.पी. रघुवंशी यांच्या कल्पनेतून या पथकाची निर्मिती केली. 

nसी-६० कमांडोंच्या अनेक तुकड्या गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत आहेत. 
nविशेष म्हणजे तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा या राज्यांमध्येही नक्षलविरोधी अभियानासाठी त्या राज्यांच्या पोलिसांची वेगवेगळी कमांडो पथके आहेत. 
nगेल्या ४-५ वर्षांतील कारवायांमध्ये महाराष्ट्र पोलिसांचे सी-६० कमांडो 
पथक सरस ठरले आहे.

ते बक्षीस कोणाला ?
चकमकीत ठार झालेल्या २६ पैकी ज्या १६ नक्षलवाद्यांची ओळख पटली त्यांच्या शिरावर राज्य शासनाने ठेवलेले १.५४ कोटींचे बक्षीस कोणाला मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ज्यांनी नक्षल्यांबाबत माहिती दिली होती त्यांना हे बक्षीस दिले जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
या कारवाईत सहभागी सी-६० कमांडोंना आणि पोलीस अधिकाऱ्यांना इन्सेन्टिव्ह आणि प्रमोशन दिले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे जातो. त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते. दरम्यान, सी-६० कमांडोंचे गडचिरोली पोलीस मुख्यालयात आगमन झाल्यानंतर त्यांचे पोलिसांकडून वाजतगाजत स्वागत करण्यात आले.

Web Title: C-60 Squad reversed Naxals' innings on them, eliminating 26 Naxals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.