वाघाला पकडण्यासाठी रवी गावाजवळ लावले पिंजरे
By Admin | Published: May 18, 2017 01:39 AM2017-05-18T01:39:44+5:302017-05-18T01:39:44+5:30
आरमोरी तालुक्यातील रवी येथील एका शेतकऱ्याचा वाघाने जीव घेतला होता. सदर नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी
मरप्पा कुटुंबाला आर्थिक मदत : जिल्हाधिकाऱ्यांची गावाला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी येथील एका शेतकऱ्याचा वाघाने जीव घेतला होता. सदर नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने रवी गावाजवळ शेतशिवारात दोन पिंजरे लावले आहेत.
रवी हे गाव आरमोरीपासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर आहे. गावालगत वैनगंगेचे पात्र आहे. या पात्रातून हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. सदर वाघ रवी तसेच नजीकच्या उसेगाव, कोंडाळा परिसरात फिरताना अनेकांनी बघितले आहे. या वाघाने रवी गावच्या वामन मराप्पा यांच्यावर हल्ला केला. त्याच्या कुटुंबियांची जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. मरप्पा यांच्या कुटुंबास वन विभागाने तातडीने २० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली, अशी माहिती उपवन संरक्षक विवेक होशिंग यांनी दिली आहे. सदर व्यक्तीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच उर्वरित ७ लाख ८० हजार रुपये दिले जाणार आहेत. याबाबतचा अहवाल तातडीने सादर करुन कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. रवी गावात सायंकाळी ७ वाजतानंतर सतत वीज पुरवठा खंडीत होत आहे. अशा स्थितीत वाघाच्या हल्ल्याची भिती गावकऱ्यांमध्ये आहे. यावर या भागातील गावांमध्ये लोडशेडींग बंद करावे व तत्काळ अखंड वीज पुरवठा सुरु ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
वाघाला पकडण्यासाठी रवी गावात दोन पिंजरे, आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मचाण तयार करून वाघाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. वन विभागाचे चार कर्मचारी आणि गावातील नागरिक सायंकाळी गस्त घालत आहेत. वाघापासून बचावासाठी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत वनविभागाने सर्वांना सूचना दिल्या आहेत. या भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.
रवीवासीय घालत आहेत गस्त
रवी येथीलच शेतकरी वामन मरप्पा यांच्या जीवाचा वाघाने घोट घेतला. त्यामुळे रवीवासीय कमालीचे संतप्त झाले आहेत. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्यानंतर वन विभागाने या ठिकाणी पिंजरे लावले आहेत. रात्रीच्या सुमारास सभोवताल गस्त घातली जात आहे. वाघाला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही रवीवासीय सहकार्य करीत आहेत.
आरमोरी येथेही देसाईगंज मार्गावरील आयटीआय परिसरात वाघ दिसला असल्याची चर्चा बुधवारी होती. त्यामुळे आरमोरीवासीयांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.