'त्या' वाघिणीचे कॉलर आयडी होते सहा महिन्यांपासून बंद; वनविभागाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 10:00 PM2020-01-19T22:00:19+5:302020-01-19T22:02:07+5:30
मृत्यूचे कारणही अद्याप अस्पष्ट
गडचिरोली: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या जंगलातील टी-४९ वाघिणीचा बछडा असलेल्या तीन वर्षीय वाघिणीचा मृतदेह शनिवारी (दि.१८) गडचिरोली जिल्ह्यात आढळला. सदर वाघिणीचा कॉलर आयडी तब्बल ६ महिन्यांपासून कामच करत नसल्याची बाब पुढे आली आहे.
सदर वाघिणीचे अस्तित्व ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात होते. तिच्या हालचाली टिपण्यासाठी कॉलर आयडी लावण्यात आले होते आणि त्याचे सनियंत्रण देहराडून येथील वन्यजीव संस्थेच्या वतीने केले जात होते. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा सदर कॉलर आयडीने काम करणे बंद केले त्यावेळी डेहराडून येथील संस्थेकडून ही बाब वनविभागाला कळविण्यात आली होती. तेव्हापासून सदर वाघिणीच्या हालचाली माहित नसताना त्याबाबत किंवा सदर वाघिणीला शोधून कॉलर आयडी पुन्हा कार्यरत करण्यासाठी वनविभागाने गंभीरपणे दखल घेतली नसल्याचे दिसून येते.
वाघिणीच्या मृत्यूनंतर जवळपास २० दिवसांनी तिच्या मृत्यूबाबतची माहिती वनविभागाला समजली. यावरून वनक्षेत्रात प्रामाणिकपणे गस्तही होते किंवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे वयाने तरूण असलेल्या सदर वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. मृत वाघिणीच्या गळ्यातील कॉलर आयडी डेहराडून येथील वन्यजीव संस्थेला पाठविण्यात आले असून ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रापासून ५० किमीपेक्षा जास्त अंतर पार करून ही वाघिण गडचिरोली जिल्ह्यातील अमिर्झा बिटमध्ये कोणत्या मार्गे आणि कधी पोहोचली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती गडचिरोलीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी शि. र. यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.