रेकी करण्यासाठी आला अन् जाळ्यात अडकला, जहाल नक्षलवादी चैनूराम जेरबंद
By संजय तिपाले | Updated: October 14, 2023 15:37 IST2023-10-14T15:36:40+5:302023-10-14T15:37:34+5:30
विशेष अभियान पथकाची कारवाई: १६ लाखांचे बक्षीस, सात चकमकीसह एका खुनात सहभाग

रेकी करण्यासाठी आला अन् जाळ्यात अडकला, जहाल नक्षलवादी चैनूराम जेरबंद
गडचिरोली : तब्बल दोन दशके नक्षलचळवळीत सक्रिय असलेल्या चैनूराम उर्फ सुक्कू वत्ते कोरसा (४८, रा.टेकामेट्टा जि.नारायणपूर, छत्तीसगड) याच्या मुसक्या आवळण्यात विशेष अभियान पथकाला १४ ऑक्टोबरला पहाटे यश आले. रेकी करण्यासाठी आलेल्या चैनूरामला एटापल्ली तालुक्यातील कुरमावडा फाट्याजवळून अटक करण्यात आली. दरम्यान, चैनूरामवर राज्य शासनाने १६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सात चकमकींसह एका खुनात त्याचा सहभाग होता.
चैनूराम उर्फ सुक्कू कोरसा हा २६ जून २००० रोजी पर्लकोटा दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला होता. २००२ मध्ये एसीएम म्हणून त्यास बढती मिळाली. २००३ मध्ये डीव्हीसीएम म्हणून तो माड विभागात कार्यरत होता. २०१४ मध्ये डीव्हीसीएम पदावरुन डिमोशन होऊन त्याने एसीएम पदावर पुरवठा टीममध्ये काम केले. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी त्याला पुन्हा डीव्हीसीएम म्हणून पदोन्नती मिळाली.
सध्या पुरवठा टीममध्ये तो उपकमांडर पदावर काम करत होता. दरम्यान, छत्तीसगड सीमेवरच्या कांकेरजवळील जारावंडी व पेंढरी या दोन्ही पोलिस ठाण्यात घातपात करण्याच्या उद्देशाने तो रेकी करण्यासाठी येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी विशेष अभियान पथक रवाना केले व नक्षलिविरोधी अभियान राबवून चैनूराम कोरसा यास बेड्या ठोकल्या.
चालू वर्षी हिक्केर जंगलात पोलिस व माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. एटापल्ली ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात चैनूरामला अटक केली आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्वल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी अपर अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख उपस्थित होते.
अशी आहे गुन्हेकारकीर्द
दरम्यान, अटक केलेला चैनूराम कोरसा हा नक्षल्यांना शस्त्र पुरविण्यात अग्रेसर होता. २००९ मध्ये छत्तीसगडच्या पुंगड, बालेवाडा, बाशिंग, २०१० मध्ये गरपा, २०११ मध्ये कोल्हार, २०२३ मधील हिक्केर जंगलातील चकमकीत त्याचा सहभाग होता. मे २०२० मध्ये पोयारकोठी जंगलातील चकमकीत एक उपनिरीक्षक व एक अंमलदार शहीद झाले होते, या चकमकीतही चैनूरामचा सहभाग होता. २०१० मध्ये कोंगाल (जि.नारायणपूर, छत्तीसगड) येथील एका निरपराध व्यक्तीचा खून केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.