घरकुल याेजनेसाठी भूमिहीनांची अट रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:35 AM2021-01-20T04:35:53+5:302021-01-20T04:35:53+5:30
वैरागड : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत याेजनेंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमातींकरिता घरकुलांचा लाभ दिला जाताे; परंतु या याेजनेसाठी ...
वैरागड : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत याेजनेंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमातींकरिता घरकुलांचा लाभ दिला जाताे; परंतु या याेजनेसाठी भूमिहीन असल्याची अट घातल्याने अनेक पात्र लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे शासनाने भूमिहीन असल्याची अट रद्द करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गडचिराेली जिल्ह्यात विमुक्त जाती, भटक्या जमातींमध्ये ढिवर, भाेई, कहार, लाेहार व तत्सम जातींचा समावेश हाेताे. अनेक वर्षांपासून या जमातींतील नागरिक याेजनांपासून वंचित आहेत. कच्च्या कुडाच्या झाेपडीत वास्तव्य करीत आहेत, तर अनेक जण पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय करून जीवन जगत आहेत. जनजागृतीअभावी समाजातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना लाभ मिळावा, यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत याेजना सुरू केली; परंतु लाभासाठी जाचक अटी लादल्याने पात्र नागरिक लाभापासून वंचित आहेत.