अबकारी कर रद्द करा
By admin | Published: March 17, 2016 01:55 AM2016-03-17T01:55:41+5:302016-03-17T01:55:41+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पात स्वर्ण व्यवसायावर लावण्यात आलेल्या १ टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ सराफा असोसिएशनच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन : क्रिष्णा गजबे यांची मागणी
वैरागड : केंद्रीय अर्थसंकल्पात स्वर्ण व्यवसायावर लावण्यात आलेल्या १ टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ सराफा असोसिएशनच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची अडचण होत आहे. त्याचबरोबर अनेक कारागीरही अडचणीत आहेत. मागील दहा ते बारा दिवसांपासून दुकाने बंद करून शासनाचा विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिकांच्या मागणीची दखल घेऊन अबकारी कर रद्द करावे, केंद्र शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
मागील दहा ते बारा दिवसांपासून दुकाने बंद असल्याने स्वर्ण व्यवसाय मोडकळीस आला आहे. सदर विषय केंद्र शासनाच्या अधिनस्त असल्याने अबकारी कर रद्द करण्याची गडचिरोली सराफा असोसिएशनची मागणी केंद्र शासनाला कळवावी, यासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. सराफा व्यावसाय बंद असल्याने जिल्ह्यातील ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी आ. गजबे यांनी केली आहे. (वार्ताहर)