अग्निशामक खरेदी ठराव रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:35 AM2018-01-21T00:35:17+5:302018-01-21T00:35:32+5:30

देसाईगंज नगरपालिकेने देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीकडून ५९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असून खरेदी किंमत व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे.

Cancel Fire extinguishers | अग्निशामक खरेदी ठराव रद्द करा

अग्निशामक खरेदी ठराव रद्द करा

googlenewsNext
ठळक मुद्देनगरसेवकांची मागणी : दोन वाहने असतानाही तिसरे खरेदी करीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज नगरपालिकेने देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीकडून ५९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असून खरेदी किंमत व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे. शिवाय नगर पालिकेकडे आधीच दोन अग्निशामक असताना तिसऱ्या वाहनाची गरज काय, असा प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित करून अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदीचा ठराव रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देसाईगंज नगर पालिकेची सर्वसाधारण सभा १४ नोव्हेंबर २०१७ ला घेण्यात आली. या सभेत विषय क्रमांक ६३/२ नुसार अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याचा ठराव घेण्यात आला. परंतु ठरावानुसार अग्निशामक यंत्र ज्या कंपनीकडून खरेदी केले जाणार आहे, त्या कंपनीच्या वाहनाची खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक आहे. देसाईगंज शहरात अग्निशामक वाहन खरेदी करण्यापेक्षा पालिका क्षेत्रातील अनेक समस्या आहेत. तसेच आवश्यक सोयीसुविधाही अनेक वॉर्डांमध्ये नाही. वाहनावर खर्च होणारा निधी विकास कामांसाठी लावल्यास शहराचा विकास होण्यास मदत झाली असती, असे नगरसेवकांनी म्हटले आहे. अतिआवश्यक सेवा सोडून अग्निशामक सुरक्षा वाहनाची गरज नसतानाही वाहन खरेदी करण्यात आले. तसेच ५९ लाख ८५ हजार रूपये वाहन खरेदीच्या रकमेत वस्तूंचे विवरणही देण्यात आले नाही. विशेष म्हणजे ४९ लाख ९० हजार रूपये किंमतीपासून अनेक कंपनींचे अग्निशामक वाहन बाजारात उपलब्ध आहेत.
वाहन खरेदीत ९ ते १० लाख रूपयापर्यंतचा अधिक निधी खर्च केला जात असून शासनाच्या पैशाचा दुरूपयोग पालिकेकडून केला जात आहे. यात नगर परिषदेलाही आर्थिक भूर्दंड पडणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आलेला अग्निशामक यंत्र खरेदी करण्याचा ठराव रद्द करावा, अशी मागणी गटनेता हाजी मो. आरिफ खानानी, नगरसेवक गणेश फाफट, नगरसेवक हरीश मोटवानी, नगरसेविका भाविका तलमले, उत्तरा तुमराम यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेद्वारे केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे.
शहरात स्वर्गरथ व रुग्णवाहिकेची आवश्यकता
देसाईगंज नगर पालिका क्षेत्रातील मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याकरिता वैनगंगा नदीकाठावर न्यावे लागतात. मुख्यालयापासून सदर अंतर तीन किमीचे आहे. त्यामुळे पालिकेला स्वत:च्या मालकीचे एक स्वर्गरथ आवश्यक आहे. शिवाय नगरपालिकेत रुग्णवाहिकाही उपलब्ध नाही. पालिका क्षेत्रातील आजारी लोकांना खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे नगर पालिकेला रुग्णवाहिका व स्वर्गरथाची आवश्यकता आहे. अत्यंत निकडीच्या वस्तू खरेदी न करता पालिकेत उपलब्ध असलेल्या वस्तूंची खरेदी केली जात आहे, असा आरोपही नगरसेवकांनी प्रशासनावर केला आहे.

Web Title: Cancel Fire extinguishers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.