गावांतर्गत वाहतूक कर रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:35 AM2019-03-30T00:35:12+5:302019-03-30T00:37:01+5:30

आरमोरी तालुक्यातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वैरागड येथे अंतर्गत रस्त्यावर बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर वाहतूक कर आकारला जातो. परंतु सदर वाहतूक कर व्यावसायिक व सर्वसामान्यांसाठी नुकसानकारक असल्याने सदर कर रद्द करावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

Cancel the transportation tax in the village | गावांतर्गत वाहतूक कर रद्द करा

गावांतर्गत वाहतूक कर रद्द करा

Next
ठळक मुद्देव्यावसायिकांची मागणी : वैरागड येथे स्थानिक प्रशासनाद्वारे दरवर्षी होते प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमोरी तालुक्यातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वैरागड येथे अंतर्गत रस्त्यावर बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर वाहतूक कर आकारला जातो. परंतु सदर वाहतूक कर व्यावसायिक व सर्वसामान्यांसाठी नुकसानकारक असल्याने सदर कर रद्द करावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.
प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने बस थांब्यानंतर गांधी चौक, ग्रामपंचायत चौक, फुले चौक किंवा गावाअंतर्गत रस्त्यावर आल्यास त्यावर ग्रामपंचायत वाहतूक कर आकारते. त्यामुळे कोणतेही प्रवाशी वाहनधारक वाहतूक कराच्या भीतीपोटी गावात वाहन आणत नाही. एखादा व्यक्ती आजारी असल्यास किंवा वयोवृद्ध, दिव्यांग असल्यास त्याला बसथांब्यापासून घरापर्यंत पायपीट करून पोहोचावे लागते. एखाद्या चारचाकी वाहनचालकाला घरी पोहोचवून देण्याची विनंती केल्यास सदर वाहनधारक वाहतूक करावी संपूर्ण रक्कम वसूल केल्याशिवाय तो घरापर्यंत वाहनाद्वारे पोहोचवून देत नाही. या वाहतूक करामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय वैरागड येथे बहुसंख्य व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने अनेक दुकानदार विविध प्रकारचा माल दुकानात वाहनाद्वारे आणतात. अशावेळी त्यांनाही वाहतूक कराचा बोजा सहन करावा लागतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लागू केलेला वाहतूक कर गावातील सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांच्या मुळावर आला आहे. सदर कर रद्द करून केवळ मोठ्या वाहनांवर वाहतूक कर कायम ठेवावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांकडून होत आहे.
स्थानिक प्रशासनाने गावात लागू केलेला वाहतूक कर ग्रामस्थांच्या मुळावर असल्याचे दिसून येते. सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कराच्या नियमाचा फटका बसत आहे. तर व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. गावाअंतर्गत वाहतूक कर रद्द करावा, अशी मागणी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे केली. यासंदर्भात गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ठराव पारित करण्याची प्रतीक्षा
या वर्षात प्रवासी वाहन किंवा चारचाकी वाहनावरील वाहतूक करासंदर्भात लिलाव होणार नाही. परंतु चारचाकी वाहनापेक्षा मोठी वाहने गावात प्रवेश करतील. त्यांच्यावर वाहतूक कर आकारण्यात येणार आहे. धान डुलाई करणारी मोठी वाहने तसेच मोठी भारवाहक वाहने गावात रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. परिणामी रस्त्याने आवागमन करणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास होतो. तसेच मालाची चढउतार करण्यासाठी गावात मोठी वाहने येतात. अशा वाहनांवर कर आकारला जाणार आहे. यामध्ये कृषी व शासकीय वाहनांना सूट दिली जाईल. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने विचार सुद्धा केलेला आहे. परंतु अद्यापही रीतसर ठराव पारित करण्यात आला नाही.

Web Title: Cancel the transportation tax in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर