आविसंने निवडला चिठ्ठी टाकून सभापतीचा उमेदवार
By admin | Published: March 31, 2017 01:06 AM2017-03-31T01:06:33+5:302017-03-31T01:06:33+5:30
आदिवासी विद्यार्थी संघाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यावर्षी अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रचंड मोठे यश मिळाले आहे.
कुटुंबात पद न घेतल्याने : दीपक आत्राम यांची राजकीय उंची वाढली
गडचिरोली : आदिवासी विद्यार्थी संघाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यावर्षी अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रचंड मोठे यश मिळाले आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या राजकारणाला शह देऊन आविसंने या मतदार संघात आपला पाया मजबूत केला आहे. यासोबतच एवढे मोठे यश मिळाल्यावरही माजी आ. दीपक आत्राम यांनी आपल्या सौभाग्यवतींचे नाव सभापती पदाच्या यादीतून डिलिट करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पत्नीला सभापती पदाची संधी दिली. यामुळे आविसंसह दीपक आत्राम यांची राजकीय उंची वाढल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटली आहे.
आदिवासी विद्यार्थी संघाकडून यंदा सात सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून आले आहे. यामध्ये पाच महिला आहेत व दोन पुरूष सदस्य आहेत. आविसंला भाजपसोबत गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्तेमध्ये बसण्याची संधी मिळाली. आविसंचे नेते अजय कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहे. आविसंला महिला व बालकल्याण विभागाचे सभापतीपदही मिळाले. या पदावर माजी आ. दीपक आत्राम आपल्या पत्नी अनिता आत्राम यांना विराजमान करतील, अशी सर्व राजकीय नेत्यांना व अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनाही आशा होती.
बहुतांशी राजकीय नेते आपल्या कुटुंबातील सदस्यांनाच पद देण्याची भूमिका घेतात. हीच रि दीपक आत्रामही ओढतील, असे वाटत असताना सभापती पदाचा उमेदवार निवडताना दीपक आत्राम यांनी आपल्या पत्नी अनिता आत्राम यांचे नाव वगळून उर्वरित चार महिला सदस्यांच्या नावाची चिठ्ठी जिल्हा परिषदेतच टाकायला सांगितली. त्यातील एक चिठ्ठी उचलून त्यांनी जयसुधा बानय्या जनगाम यांचे नाव सभापती पदाचे उमेदवार म्हणून निश्चित केले. दीपक आत्राम यांची ही राजकीय खेळी आविसंच्याही अनेक कार्यकर्त्यांना धक्का देऊन गेली. भाजपला या निर्णयाची माहिती मिळताच त्यांनाही याचे आश्चर्य वाटले. दीपक आत्राम यांनी आपल्या कुटुंबातील सदस्याला पद नको, अशी भूमिका घेतल्यामुळे दीपक आत्राम यांची राजकीय उंची वाढली आहे.
बहुतांश राजकीय नेते कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यापासून ते निवडून आल्यानंतर पद देण्याबाबत आग्रही भूमिका घेत असतात. गडचिरोली जिल्ह्याचेही राजकारण याला अपवाद नाही. मात्र माजी आ. दीपक आत्राम यांची ही खेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली. दीपक आत्राम यांच्या पत्नी अहेरी तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत. त्यांना सभापती पद मिळेल, असे वाटत असताना दीपक आत्राम यांनी मात्र पत्नीचा पत्ता कापला. (जिल्हा प्रतिनिधी)