प्रमुख पाच पक्षांचे उमेदवार तयार, जागा कोणत्या पक्षाला सुटणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 03:41 PM2024-09-24T15:41:38+5:302024-09-24T15:43:11+5:30
जोरदार रस्सीखेच : विद्यमान आमदारांना मिळणार का पुन्हा संधी, उत्सुकता वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, सध्या महायुती व महाविकास आघाडीतील प्रमुख पाच पक्षांमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप, काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादी व उद्धव सेना मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळणार की तिकीट कापणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत समोरासमोर लढत झाली. विधानसभा निवडणुकांमध्ये देखील स्वतंत्र लढण्याऐवजी महायुती व महाविकास आघाडी म्हणूनच मैदानात उतरण्याची तयारी सुरू आहे. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीवर दावे-प्रतिदावे सुरू आहेत. एकेका पक्षात चार ते पाचजण इच्छुक असल्याने यावेळी मतदार देखील संभ्रमात आहेत.
राजनगरी अहेरीत माजी जि.प. सदस्या भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांविरुद्ध केलेले बंड राज्यभर गाजले. यामळे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची काहीशी कोंडी झाली आहे. त्यांचा सामना माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी होत असे. आता त्यात कन्येची भर पडली आहे. त्यामुळे त्यांना नात्यातच दुहेरी संघर्ष करावा लागणार आहे. गडचिरोली व आरमोरीत लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात कौल मिळाला. त्यामळे विद्यमान आमदारांना हादरा बसला आहे. डॅमेज कंट्रोलसाठी सध्या युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. वंचित व शेकापही शइ ठोकन तयार आहेत.
जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ
गडचिरोली : हा मतदारसंघ भाजपकडे असून, डॉ. देवराव होळी हे नेतृत्व करतात. यावेळी भाजपकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे.
आरमोरी: भाजपचे कृष्णा गजबे येथील आमदार आहेत. लोकसभेत येथे महायुती पिछाडीवर गेल्याने गजबे यांचा कस लागणार आहे.
अहेरी : मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ आहे. नात्या-गोत्यांच्या लडतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
उमेदवारी शेवटच्या क्षणाला जाहीर होणार
सर्वच प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. नाराजी होऊ नये, बंड टाळता यावे, यासाठी उमेदवारी अगदी शेवटच्या क्षणी जाहीर केली जाणार आहे. सध्या सर्वच इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. यामध्ये कोणाची लॉटरी लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उमेदवार निवडताना प्रमुख पक्षनेतृत्वाचाही कस लागणार आहे
..... हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर काय होणार ?
आमदार डॉ. देवराव होळी व आमदार कृष्णा गजबे सलग दोन टर्म मतदारसंघाचे नेतृत्व करतात. हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर त्यांचे राजकीय भवितव्य काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. पक्ष उमेदवारी देणार का, दिली तर मतांच्या परीक्षेत निभाव लागणार का, हे पाहणे मोठे रंजक असेल. निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
प्रमुख पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया
"भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. पक्षश्रेष्ठी उमेदवार निवडीबाबत अंतिम निर्णय घेतील. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी सध्या सुरू आहे."
- प्रशांत वाघरे, जिल्हाध्यक्ष भाजप
"काँग्रेसने जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रांवर दावा केला आहे. ३० ते ३२ जण इच्छुक आहेत. सव्र्व्हे सुरू आहे. यातून पक्षश्रेष्ठी योग्य उमेदवार निवडतील."
- महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
"जागावाटप निश्चित झाल्यावर उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरेल. सध्या आम्ही अहेरी व गडचिरोली या दोन जागा मागितल्या आहेत."
- अतुल गण्यारपवार, जिल्हाध्यक्ष राकाँ. (शरद पवार गट)
"अहेरी आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. गडचिरोलीवरही दावा केला आहे. महायुती योग्य निर्णय घेईल. पक्षाचा आदेश अंतिम असेल."
- रवींद्र वासेकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
"काँग्रेसला गडचिरोली व आरमोरीत सतत अपयश आलेले आहे. त्यामुळे यावेळी उद्धव सेनेला येथे संधी द्यावी, अशी मागणी आपण पक्षातर्फे यापूर्वीच केलेली आहे."
- वासुदेव शेडमाके, जिल्हाप्रमुख उद्धव सेना