अवजड वाहनांमुळे काेंडी, अपघाताचा धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:54+5:302021-01-08T05:56:54+5:30
आष्टी : गडचिराेली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या आष्टी येथील डाॅ. आंबेडकर चाैकात माेजकी जागा असल्याने अवजड व ...
आष्टी : गडचिराेली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या आष्टी येथील डाॅ. आंबेडकर चाैकात माेजकी जागा असल्याने अवजड व लांब वाहने फिरण्यास अडचणी येत आहेत. दुचाकी व पादचारी वाहनधारकांना अवजड वाहनांपासून धाेका असताे. अनेकदा वाहनांमुळे काेंडी निर्माण हाेते. त्यामुळे चाैकातील रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गडचिराेलीवरून अहेरीकडे तसेच गाेंडपिपरीमार्गे दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. आष्टी येथील मुख्य चाैकातूनच वाहने जात असतात. आधीच अरुंद असलेल्या चाैकात अवजड वाहनांमुळे वाहतुकीची काेंडी हाेते. वाहने वळताना मागे येणाऱ्या वाहनधारकांना धाेका हाेण्याची शक्यता असते. अपघाताचा धोका ओळखून या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करण्याची मागणी नागरिकांची आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्गाने दिवसभर ट्रेलर व जड वाहनांची वर्दळ असते. तसेच मुख्य चौक असल्याने या ठिकाणी सायंकाळी बरीच गर्दी असते. बरेचदा पुतळ्याच्या संरक्षक भिंतीला वाहनांनी धडक दिलेली आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून चौकातील रुंदीकरण करण्याची नितांत गरज आहे. परंतु वाहनांच्या गतीवरील नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बरीच जड वाहने दुकानाच्या समोर उभी असतात. त्यामुळे वाहतुकीस अडसर येताे. सध्या चामाेर्शी ते येनापूरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे.
बाॅक्स ......
अतिक्रमणांमुळेही रस्ता अरुंद
आष्टी येथील मुख्य चाैकासह अन्य रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागताे. बऱ्याच दुकानदारांनी पार्किंगची साेय न केल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने ठेवून वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर अतिक्रमणांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.