कार व काळी पिवळी वाहनात भीषण टक्कर, सात ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 12:20 PM2018-07-01T12:20:48+5:302018-07-01T12:20:55+5:30
कार आणि काळी-पिवळी वाहनांत झालेल्या भीषण अपघातात दोन बालकांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जिमलगट्टा (गडचिरोली)- कार आणि काळी-पिवळी वाहनांत झालेल्या भीषण अपघातात दोन बालकांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास जिमलगट्टापासून 5 किलोमीटरवर असलेल्या गोविंदगावच्या बस थांब्याजवळ झाला.
मृतांमध्ये कमल मारोती मित्तलवार (35), मारोती केशवराव मित्तलवार (60), लता मारोती मित्तलवार (55), श्रीनीता कमल मित्तलवार (5 महिने), सरस संदीप मित्तलवार (दीड वर्ष) तसेच गडचिरोलीजवळील मुरखेडाचे रहिवासी असलेले काळीपिवळी वाहनातील निखिल देवराव मोहुर्ले (28) आणि चालक संदीप आनंदराव गडप (40) यांचा समावेश आहे. याशिवाय सीमा कमल मित्तलवार, अर्चना संदीप मित्तलवार, त्रिशा सुधीर अक्केवार, प्रतिमा देवराव मोहुर्ले आणि देवराव सखाराम मोहुर्ले हे जखमी आहेत. त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूरच्या मित्तलवार कुटुंबातील लोक आपल्या सुझुकी बोलेनो कारने तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात होते. याच वेळी सिरोंचावरुन मोहुर्ले कुटुंबीय घरचे सामान घेऊन मुरखेडाकडे येत होते. सिरोंचा पंचायत समितीमधून देवराव मोहुर्ले यांची बदली झाल्याने ते आपले सामान गावाकडे आणत होते. मात्र गोविंदगाव येथे दोन्ही वाहनांची भीषण टक्कर झाली आणि सात लोकांना जीव गमवावा लागला.