वाहकाने दाखविला प्रामाणिकपणा
By admin | Published: June 19, 2017 01:47 AM2017-06-19T01:47:04+5:302017-06-19T01:47:04+5:30
अहेरी आगाराच्या अहेरी-चंद्रपूर बसमधील महिला प्रवाशाची पर्स वाहकाला मिळाली.
अहेरी आगारातील घटना : हरविलेले २० हजार रूपये केले परत
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी आगाराच्या अहेरी-चंद्रपूर बसमधील महिला प्रवाशाची पर्स वाहकाला मिळाली. त्या पर्समध्ये २० हजार २३ रूपये होते. वाहकाने पर्ससह रक्कम प्रवासी महिलेला परत करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे.
अहेरी आगाराच्या एमएच ४० वाय ५४११ क्रमांकाच्या बसमध्ये तेलंगणा राज्यातील महिला प्रवासी चंद्रपूरवरून बसल्या. सदर महिला प्रवासी अहेरी येथे उतरली. अहेरी येथे बस आल्यानंतर वाहक एम. एम. घेर व चालक जे. पी. इंगळे यांना बसमध्ये एक छोटी पर्स दिसून आली. लगेच त्यांनी याबाबतची माहिती अहेरीचे बसस्थानक प्रमुख जितेंद्र राजवैद्य यांना दिली. त्यांनी ही रक्कम व पर्स कार्यालयात जमा केली. सायंकाळी पर्स हरविल्याची बाब ईश्वरीया प्रवासी महिलेला कळली. त्यांनी अहेरी स्थानकात विचारपूस केली. सर्व माहितीची शहानिशा केल्यानंतर आगार प्रमुख जितेंद्र राजवैद्य, वाहतूक नियंत्रक सुभाष बोंडे यांनी सदर रक्कम महिला प्रवाशास परत केली. प्रवासी महिलेने वाहकाचे कौतुक केले. वाहक घेर यांच्या या प्रामाणिकपणामुळे आदर्श निर्माण झाला आहे.