पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस जवानावर गुन्हा; हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 04:12 PM2022-10-27T16:12:47+5:302022-10-27T16:13:41+5:30
अवघ्या दीड वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षांच्या मुलीसमोर उषा यांनी गळफास घेतला होता.
अहेरी (गडचिरोली) : गेल्या १६ ऑक्टोबर रोजी स्वत:च्या घरी गळफास घेणाऱ्या उषा तुकाराम गीते यांच्या आत्महत्येसाठी सी-६० पथकात कमांडो असलेले त्यांचे पतीच जबाबदार असल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उषा यांच्या वडिलांनी आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता असा आरोप केला आहे.
मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले तुकाराम गीते हे सध्या येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात कार्यरत आहेत. नक्षलविरोधी अभियान पथक, अर्थात सी-६० कमांडो पथकात त्यांचा समावेश केला होता. उषा आणि तुकाराम या दाम्पत्याला दोन छोटी मुले आहेत. पण हुंड्याच्या पैशावरून त्यांच्यात खटके उडत होते. येथील हॉकी ग्राउंडजवळ किरायाच्या घरात त्यांचे वास्तव्य होते. जवळपास महिनाभर तुकाराम गीते प्रशिक्षणावर गेले होते. तेथून परत आल्यानंतर काही दिवसातच ही घटना घडली.
उषा गीते यांचे वडील वसंत रामराव कंदारे रा. नांदेड यांनी जावई तुकाराम गीते यांच्यावर हुंड्यासाठी मुलीला त्रास देत असल्यानेच तिने आत्महत्या केली, अशी तक्रार अहेरी पोलीस स्टेशनमध्ये दिली.
चिमुकल्या दोन मुलांचे होणार हाल
अवघ्या दीड वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षांच्या मुलीसमोर उषा यांनी गळफास घेतला होता. आतून लावलेली दाराची कडी मुलीला काढता आली नाही. त्यामुळे तिने खिडकीत येऊन ‘आई लटकली’ असे ओरडत मदतीची याचना केली. त्यामुळे शेजारचे धावून आले. मात्र, त्यांनाही दाराची कडी उघडता आली नाही. अखेर पतीला माहिती दिल्यानंतर त्यांनीच दार उघडून घरात प्रवेश केला, पण तोपर्यंत उशिर झाला होता. आईच्या आत्महत्येमुळे ही दोन लहान मुले पोरकी झाली आहेत. पोलीस जवान असलेल्या तुकाराम गीते यांच्यावर हुंडाबळी कायद्यांतर्गत भादंवि कलम ३०४ (ब),४९८ (अ), ३२३, ३०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.