गडचिरोलीत 'माया' जमविणाऱ्या पालघरच्या 'आरएफओ'वर गुन्हा
By संजय तिपाले | Published: September 20, 2024 07:01 PM2024-09-20T19:01:16+5:302024-09-20T19:02:33+5:30
पत्नीही आरोपी : आढळली ६६ लाख रुपयांची असंपदा, 'एसीबी'कडून घरझडती
गडचिरोली: गडचिरोलीत दहा वर्षे सेवा करणाऱ्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यास सहकारी महिला कर्मचाऱ्याकडून पावणे दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक केली होती. उघड चौकशीत त्याने मोठ्या प्रमाणात गैरमार्गाने 'माया' जमविल्याचे स्पष्ट झाले. अखेर २० सप्टेंबरला त्याच्याविरुध्द असपंदेचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच्या पत्नीलाही आरोपी केले आहे. दिवाकर रामभाऊ कोरेवार असे त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव असून तो सध्या पालघरच्या पाली (ता. वाडा) वनविभागात कार्यरत आहे.
दिवाकर कोरेवार हा वडसा वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होता. सहकारी महिला कर्मचाऱ्याकडून पावणे दोन लाख रुपयांची लाच घेताना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी २०२० मध्ये कोरची पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, पो.नि.शिवाजी राठोड यांनी या गुन्ह्याच्या तपासात त्याची उघड चौकशी केली. यामध्ये त्यास सुमारे ६६ लाख ८ हजार ४०४ रुपयांच्या मालमत्तेचे विवरण देता आले नाही. कायदेशीर उत्पन्नापेक्षा अधिक आढळलेली ही संपत्ती जमविण्यात पत्नी पार्वती कोरेवार हिनेही साथ दिल्याचे निष्पन्न झाल्याने दाम्पत्यावर गडचिरोली ठाण्यात कलम १३ (१) (अ) (ब), १३ (२), १२ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले , पो.नि. शिवाजी राठोड, संतोष पाटील, सहायक उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, राजेश पद्मगीरवार, किशोर जोजारकर, पो.ना. स्वप्नील बांबोळे, अंमलदार संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके , विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना वसाके, प्रफुल्ल डोर्लीकर यांनी शहरातील रामनगर येथील त्याच्या बंगल्यावर धाड टाकून चित्रीकरणात झडती घेतली.
"दहा वर्षांच्या कार्यकाळात संबंधितांनी असंपदा जमविल्याचे समोर आले आहे. घर झडतीत मालमत्तेबाबत नवीन काही आढळून आले नाही.
त्यांना नोटीस बजावली असून एसीबी कार्यालयात १५ दिवसांच्या आत हजर राहण्यास सांगितले आहे."
- चंद्रशेखर ढोले, उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली
गडचिरोलीत बंगला, प्लॉट, सासरवाडीत शेती
दरम्यान, १९९५ मध्ये वनरक्षक म्हणून रुजू झालेल्या दिवाकर कोरेवार याने वनपरिक्षेत्र अधिकारीपदापर्यंत मजल मारली. २०११ ते २०२० दरम्यान गडचिरोलीत सेवा बजावताना त्याच्या मालमत्तेत वाढ ८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. यातून त्याने गडचिरोलीत आलिशान बंगला, प्लॉट अन् मूल (जि. चंद्रपूर) येथे सासरवाडीत शेती खरेदी केल्याचेही निष्पन्न झाले. या सर्व मालमत्तेचा हिशेब त्यास देता आला नाही, त्यामुळे त्याच्यावर असंपदेचा गुन्हा नोंदविण्यात आला.