देसाईगंज फसवणूकप्रकरणी सहा जणांच्या घरांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:30 PM2019-07-03T22:30:43+5:302019-07-03T22:31:02+5:30
येथील बहुचर्चित शिफा व तिच्या सहकाऱ्यांकडून झालेल्या फसवणूकप्रकरणी बुधवारी देसाईगंज पोलिसांनी शहरातील ६ जणांच्या घरी धाडी घालून चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडील दस्तावेजाची पोलिसांनी कसून तपासणी करून या गुन्ह्याशी त्यांचा कितपत संबंध आहे याची चाचपणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : येथील बहुचर्चित शिफा व तिच्या सहकाऱ्यांकडून झालेल्या फसवणूकप्रकरणी बुधवारी देसाईगंज पोलिसांनी शहरातील ६ जणांच्या घरी धाडी घालून चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडील दस्तावेजाची पोलिसांनी कसून तपासणी करून या गुन्ह्याशी त्यांचा कितपत संबंध आहे याची चाचपणी केली.
सकाळी ७ वाजता पोलिसांनी सहा वेगवेगळे पथक करून आकाश अग्रवाल, अजय अग्रवाल, अरुण साळवे, बबलू जीवाणी, इब्राहीम खान, भोला पटेल यांच्या घरी चौकशीला सुरूवात केली. त्यांच्या घरात या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे मिळतात का याचीही तपासणी पोलिसांकडून करण्यात आली. काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचेही समजते. मात्र त्याबाबतचा तपशिल देण्यास पोलिसांनी नकार दिला. तूर्त चौकशी सुरू असून ठोस माहिती हाती लागल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे सांगण्यात आले.
दरम्यान शहरात दुपारीच हे वृत्त पसरल्यानंतर सायंकाळपर्यंत या प्रकरणात कोणाकोणाला ताब्यात घेतले जाते याची उत्सुकता सर्वांना लागली होती. गेल्या आठवड्यात या प्रकरणात नागरिकांचा थेट संबंध आलेल्या शिफा उर्फ शबाना मोहम्मद शेख हिला उत्तर प्रदेशातून अटक केल्यानंतर दोन वेळा पोलिसांनी तिचा पीसीआर घेतला. त्यात या गुन्ह्याशी संंबंधित बरीच माहिती शिफाने पोलिसांना दिली. त्यावरूनच पोलिसांनी बुधवारी देसाईगंजमधील काही लोकांकडे चौकशी सुरू केली.
कमी दरात वस्तू, दागिने देण्याचे आमिष देत शेकडो नागरिकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविण्यात आले. हे पैसे शिफाने काही लोकांकडे जमा केले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.