देसाईगंजातील ‘त्या’ दाेन रुग्णालयांच्या संचालकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:37 AM2021-05-10T04:37:10+5:302021-05-10T04:37:10+5:30
देसाईगंज नगर परिषद हद्दीत अनाधिकृत कोविड रुग्णालय चालवित असल्याच्या गोपनीय माहितीवरून डॉ. मनोज बुद्धे यांच्या आशा क्लिनिक व गांधी ...
देसाईगंज नगर परिषद हद्दीत अनाधिकृत कोविड रुग्णालय चालवित असल्याच्या गोपनीय माहितीवरून डॉ. मनोज बुद्धे यांच्या आशा क्लिनिक व गांधी वॉर्डातील डॉ. श्रीकांत बन्सोड यांच्या हॉस्पिटलची २ मे राेजी तपासणी केली असता दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच रुग्ण कोविड आजाराचा उपचार घेत असल्याचे आढळून आले.
कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याच्या परवानाबाबतीत विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याचे दाेन्ही रुग्णालयांच्या संचालकांनी सांगीतले. त्यावरून त्याच दिवशी या दाेन्ही रुग्णालयांना सील ठाेकण्यात आले हाेते. चाैकशीत आराेप सिद्ध झाल्याने दाेन्ही रुग्णालयांविराेधात तहसीलदार संताेष महल्ले यांनी देसाईगंज पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून डॉ. मनोज बुद्धे व डॉ. श्रीकांत बन्सोड यांच्या विराेधात भादंवि कलम १८८, २७९, २८० सहकलम ५१(ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, सहकलम २,३ व ४, साथरोग अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक सोनम नाईक पुढील तपास करीत आहेत.
दवाखान्यात हा औषधीसाठा आढळला
कारवाई झालेल्या दाेन्ही दवाखान्यांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉंसेंट्रेटर, ऑक्सिजन मॉनिटर, ऑक्सिमीटर, फॅबिफ्यु गोळ्या, डॉक्झिसाक्लिन गोळ्या, ऑस्पिरिन गोळ्या, इव्हरमेक्टीन गोळ्या, ए हिस्ट -मोस्ट गोळ्या, अझीथ्रोमॉसिन गोळ्या, व्हिटॅमिन सी गोळ्या आढळून आल्या. एवढा माेठा साठा काेणत्या मेडिकलमधून आणण्यात आला, याचीही चाैकशी करण्याची गरज आहे.