कॉप्यांचा बाजार मांडणाऱ्या 'त्या' केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:00 PM2023-03-10T12:00:52+5:302023-03-10T12:04:20+5:30

कथित व्हिडीओ व्हायरल प्रकरण : तहसीलदारांकडून फौजदारी

case registered against head of the center whom captured in a video while taking money from students for copying in the exam | कॉप्यांचा बाजार मांडणाऱ्या 'त्या' केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल

कॉप्यांचा बाजार मांडणाऱ्या 'त्या' केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल

googlenewsNext

कुरखेडा (गडचिरोली) : येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात बारावी परीक्षेत कॉपी करण्यासाठी पैसे उकळणाऱ्या केंद्रप्रमुखाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या नागपूर येथील सचिवांनी कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, ९ मार्च रोजी तहसीलदारांनी केंद्रप्रमुख प्रा. किशोर अंबरदास कोल्हे याच्याविरोधात कुरखेडा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

माध्यमांवर टीका, शैक्षणिक वर्तुळात खळबळ

  • कुरखेडा येथील इयत्ता बारावी परीक्षेकरिता केंद्रप्रमुख म्हणून याच महाविद्यालयातील प्रा. किशोर कोल्हे यांची नियुक्ती केली होती. दरम्यान, कॉपी करण्यासाठी परीक्षार्थींकडून पैसे उकळताना प्रा. कोल्हे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. माध्यमांमध्ये हा विषय गाजला होता.
  • याची दखल घेत ९ मार्च रोजी तहसीलदार सोमनाथ माळी यांनी कुरखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रा.किशोर कोल्हेवर महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळाच्या व परीक्षांमध्ये गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांचा मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नारायण शिंदे तपास करीत आहेत.

घरी एक हजार रुपये द्या; अन् बारावीत बिनधास्त कॉपी करा; खळबळजनक प्रकार

काय आहे व्हिडीओत...

कथित व्हिडीओमध्ये प्रा. किशोर कोल्हे राहत असलेल्या खोलीतच बारावीच्या परीक्षार्थींकडून कॉपी करू देण्यासाठी हजार-पाचशे रुपये घेताना दिसत आहेत. पैसे देणाऱ्याचे नाव व मोबाइल क्रमांक एका कागदावर लिहून घेत असल्याचे दिसून येत आहे. खुद्द केंद्रप्रमुखानेच हा बाजार मांडल्याने समाजमाध्यमातून संताप व्यक्त होत होता.

केंद्रप्रमुखाची होणार चौकशी

या घटनेनंतर केंद्रप्रमुख पदावरून प्रा. किशोर कोल्हेला तडकाफडकी हटविण्यात आले आहे. त्याला पदमुक्त करून कालिदास सोरते यांना केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. प्रा. कोल्हे याच्या चौकशीचे आदेश विभागीय सचिवांनी शिक्षणाधिकारी आर.पी. निकम यांना दिले आहेत.

दहावी, बारावी परीक्षेत कोठे गैरप्रकार होत असेल तर तात्काळ शिक्षण विभागाशी संपर्क करावा. संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

- आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी (मा.) व सदस्य सचिव जिल्हा दक्षता समिती, गडचिरोली

Web Title: case registered against head of the center whom captured in a video while taking money from students for copying in the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.