पैसे बुडविणारे तेंदूपत्ता कंत्राटदार पुन्हा सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:25 AM2019-03-17T00:25:00+5:302019-03-17T00:25:46+5:30
२०१७ च्या तेंदूपत्ता हंगामातील मजुरी व रॉयल्टीचे पैसे बुडविणाऱ्या कंत्राटदारांनी कंपन्यांची नावे बदलवून पुन्हा यावर्षीच्या तेंदूपत्ता हंगामातील लिलावात सहभाग घेण्यास सुरूवात केली आहे. अधिक भावाच्या लालसेपोटी याच कंत्राटदारांना यावर्षीचाही तेंदूपत्ता संकलनाचा कंत्राट मिळाल्यास ग्रामसभांची याही वर्षी फसवणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१७ च्या तेंदूपत्ता हंगामातील मजुरी व रॉयल्टीचे पैसे बुडविणाऱ्या कंत्राटदारांनी कंपन्यांची नावे बदलवून पुन्हा यावर्षीच्या तेंदूपत्ता हंगामातील लिलावात सहभाग घेण्यास सुरूवात केली आहे. अधिक भावाच्या लालसेपोटी याच कंत्राटदारांना यावर्षीचाही तेंदूपत्ता संकलनाचा कंत्राट मिळाल्यास ग्रामसभांची याही वर्षी फसवणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२०१७ च्या तेंदूपत्ता हंगामात कंत्राटदारांनी चढ्या दराने बोली लावून तेंदूपत्ता खरेदी केला होता. काही गावांच्या तेंदूपत्त्याचा दर सुमारे १८ हजार रुपये प्रती स्टॅन्डर्ड बॅग पर्यंत पोहोचला होता. बिडी निर्मिती कंपन्यांकडून दामदुप्पट भाव मिळेल, अशी अपेक्षा कंत्राटदारांना होती. मात्र काही दिवसातच तेंदूपत्त्याचे दर कोसळले. तेंदूपत्त्याच्या बाजारात प्रचंड मंदी निर्माण झाल्याने तेंदूपत्त्याची मागणीही घटली होती. कित्येक कंत्राटदारांचा तेंदूपत्ता वर्ष उलटूनही गोदामातच पडून होता. २०१७ च्या तेंदूपत्त्याच्या हंगामात कंत्राटदारांना मोठा तोटा सहन करावा लागला असला तरी करारनाम्याानुसार मजुरांची मजुरी व रॉयल्टीची रक्कम देणे हे कंत्राटदाराचे कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. मात्र काही कंत्राटदारांनी रॉयल्टी व मजुरीही दिली नाही. ग्रामसभांनी याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारांना नोटीस बजावून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविले होते. मात्र कंत्राटदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली नाही. मागील वर्षीच्या कंपनीच्या नावाने कंत्राट मिळणार नाही. ही बाब लक्षात घेऊन पैसे बुडविणाºया कंत्राटदारांनी नवीन कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांच्या नावाने लिलावात सहभाग घेतला जात आहे. सदर कंत्राटदार लिलावादरम्यान अधिक बोली बोलून तेंदूपत्त्याचे कंत्राट आपल्याकडेच राहिल, याची व्यवस्था करतात. नंतर मात्र पैसे दिले जात नाही. त्यामुळे पैसे बुडव्या या कंत्राटदारांकडून यावर्षीही मजूर व ग्रामसभांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामसभांनी अशा कंत्राटदारांबाबत सावध राहण्याची गरज आहे.
तालुके बदलवून लिलावात सहभागी
गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कमीजास्त प्रमाणात तेंदूपत्त्याचे संकलन केले जाते. २०१७ च्या हंगामात सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या दक्षिण भागातील तालुक्यांमधील ग्रामसभांचे पैसे बुडविणारे कंत्राटदार यावर्षी उत्तरेकडे असलेल्या कुरखेडा, कोरची, देसाईगंज या तालुक्यांमधील लिलावात सहभागी होत आहेत. पैसे बुडविल्याची माहिती ग्रामसभांना होऊ नये, यासाठी ही चाल खेळली जात आहे. ग्रामसभांनी तेंदूपत्त्याच्या लिलावाचा करार करताना संबंधित कंत्राटदाराची पूर्वपार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे. अन्यथा याही वर्षी फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या कंत्राटदारांनी फसवणूक केली, अशा कंत्राटदारांची नावे प्रशासनाच्या वतीने जाहीर करणे आवश्यक आहे. जेणेकरून ग्रामसभा संबंधित कंत्राटदाराबाबत सावध राहतील.