कॅशलेस एटीएमने ग्राहकांची पंचाईत; व्यवहार कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:30 AM2018-03-31T00:30:33+5:302018-03-31T00:30:33+5:30
भगवान महावीर जयंती निमित्त बुधवारी बँकांना शासकीय सुट्टी होती. गुरुवारी गुडफ्रायडेची सुट्टी आल्याने सलग दोन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प होते.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : भगवान महावीर जयंती निमित्त बुधवारी बँकांना शासकीय सुट्टी होती. गुरुवारी गुडफ्रायडेची सुट्टी आल्याने सलग दोन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प होते. दरम्यान गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागातील बहुतांश एटीएमची रोकड गुरुवारीच संपल्याने ग्राहकांची पंचाईत झाली.
शुक्रवारी गडचिरोली शहरातील स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, महाराष्टÑ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यासह सर्वच शासकीय व खासगी बँकांच्या एटीएमची सेवा कोलमडली होती. अनेक एटीएमसमोर कॅशलेसचे फलक शुक्रवारी झळकत होते. चामोर्शी व चंद्रपूर मार्गावरील बहुतांश एटीएम रोकडअभावी बंद होते. याच कालावधीत बँकांना सुट्या असल्याने नागरिकांना आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला.
गडचिरोली शहरासारखीच आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, चामोर्शी, एटापल्ली, धानोरा आदी ठिकाणीही एटीएमची अशीच व्यवस्था कोलमडली होती. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक रोकड काढण्यासाठी गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी देसाईगंज शहरात दाखल झाले. मात्र एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागले. मार्च एन्डींगमुळे नागरिकांचे बँक व्यवहार ठप्प झाले आहे. एकूणच गेल्या तीन दिवसांपासून बँकिंग व एटीएमची सेवा कोलमडली आहे.