जात हरली, प्रेम जिंकले, बंधने झुगारून बांधली रेशीमगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 04:35 PM2023-07-04T16:35:40+5:302023-07-04T16:40:33+5:30

तंटामुक्त समितीचा पुढाकार : एकाच वर्गात शिकले, बारावीनंतर प्रेम अन् लग्न

Caste lost, love won; they studied in the same class, fell in love after 12th and decides to marry | जात हरली, प्रेम जिंकले, बंधने झुगारून बांधली रेशीमगाठ

जात हरली, प्रेम जिंकले, बंधने झुगारून बांधली रेशीमगाठ

googlenewsNext

कुरखेडा (गडचिरोली) : ते दोघे वेगवेगळ्या जातींचे. शालेय जीवनात एकाच वर्गात शिकले, बारावीनंतर दोघांनी शिक्षणाच्या वेगवेगळ्या वाटा निवडल्या; पण ओळखीतून मित्र बनलेली ती अन् तो मनाने घट्ट जोडले गेले. ओळखीचे रूपांतर प्रेमात व नंतर लग्नात झाले. लग्नासाठी नेहमीप्रमाणे जात आडवी आली; पण तंटामुक्त समितीने पुढाकार घेतल्याने अखेर जात हरली अन् प्रेम जिंकले. २ जुलै रोजी तालुक्यातील खोब्रामेंढा येथे त्या दोघांनी रेशीमगाठ बांधली.

रोहिणी व सचिन या प्रेमवीरांची कहाणी मोठी रंजक. सचिन विश्वनाथ कवडो हा गेवर्धा (ता. कुरखेडा) येथील, तर रोहिणी ही टेकडी (ता. देवरी, जि. गोंदिया) या गावची. दोघांच्याही घरची परिस्थिती बिकट. कुरखेडा येथे त्यांचे एकाच शाळेत शिक्षण झाले. सचिन गावाहून सायकलने शाळेत ये- जा करायचा, तर रोहिणी वसतिगृहात राहायची. शालेय जीवनातील ओळखीचे बारावीनंतर प्रेमात रूपांतर झाले. यातून भेटीगाठी वाढल्या. ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’ अशा आणाभाका घेऊन त्यांचे प्रेम फुलत गेले. मात्र, अपेक्षेप्रमाणे मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केलाच. मुलगा आपल्या जातीबाहेरचा आहे. त्यामुळे हा विवाह त्यांना मान्य नव्हता. मात्र, सचिनसोबतच संसार थाटायचा यावर रोहिणी ठाम होती.

रोहिणीच्या घरातून वाढता विरोध लक्षात घेता दोघांनीही गेवर्धा येथील तंटामुक्त समिती पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तंटामुक्त समितीने मुलीच्या कुटुंबीयांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. अखेर खोब्रामेंढा गावातील श्रीक्षेत्र हनुमान मंदिरात तंटामुक्त समिती पदाधिकारी व सचिन कवडो याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.

याप्रसंगी गेवर्धाच्या सरपंच सुषमा मडावी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजूबारई, ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद, तंटामुक्त समिती सदस्य राजेंद्र कुमरे, सुधीर बाळबुद्धे, खोब्रामेंढा येथील सरपंच जास्वंदा धुर्वे, मालेवाडाचे उपसरपंच तुळशीदास बोगा, देवस्थान समिती सदस्य उद्धव पेंदाम, उत्तम कवडो, बाबा सय्यद, एकनाथ कवडो हे या विवाहसोहळ्याचे साक्षीदार ठरले.

‘कहीं खुशी, कहीं गम...’

सचिनने आयटीआयचे शिक्षण घेतलेले आहे. यातून तो स्वत:चा रोजगार थाटणार आहे, तर रोहिणी बीएच्या द्वितीय वर्षात शिकते. आयुष्यभराचे सोबती होण्याचा निर्णय दोघांनी संमतीने घेतला, तो तंटामुक्त समितीमुळे सत्यात उतरला. त्यामुळे विवाह पार पडल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर प्रसन्नता होती; पण दुसरीकडे रोहिणीच्या कुटुंबीयांची नाराजी असल्याने थोडी काळजीही दिसून आली.

Web Title: Caste lost, love won; they studied in the same class, fell in love after 12th and decides to marry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.