कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:17 AM2018-03-06T00:17:17+5:302018-03-06T00:17:17+5:30
कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.
राज्य शासनाने ३० टक्के नोकर कपातीचे धोरण जाहीर केले आहे. सहा लाख कर्मचारी शासकीय सेवेतून कमी होणार आहेत. यामुळे ३० टक्के नोकर कपातीचे धोरण रद्द करावे. ९ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयात करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर शासन निर्णय मागे घेण्यात यावा. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष त्वरीत भरावा, भारतीय संविधानातील कलम १६ (४)-(अ) नुसार पदोन्नतीतील आरक्षण कायम करण्यात यावा. समान काम समान वेतन या निर्णयाची अंमलबजावणी करावी. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. अंगणवाडीमध्ये काम करणाºयांना चतुर्थ वेतन श्रेणी लागू करावी. महाराष्ट्र सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्वी प्रमाणचे उच्च शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती लागू करावी. सर्व शाळांमधून समान शिक्षण द्यावे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये. कृषी विद्यापीठांतर्गत सरळ सेवा व पदोन्नतीतील अन्याय दूर करावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय बन्सोड, कार्याध्यक्ष सदानंद ताराम, सरचिटणीस गौतम मेश्राम, कोषाध्यक्ष तुमेन बन्सोड, ज्येष्ठ उपाध्यक्ष जगन्नाथ हलामी, महिला प्रतिनिधी निर्मला रामटेके, उपाध्यक्ष महेश जेंगठे, सल्लागार बंडू खोब्रागडे, केंद्र प्रमुख ब्रह्मानंद उईके, उपसचिव दुषांत तुरे, उपाध्यक्ष शालिक मेश्राम, महाराष्टÑ राज्य शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष अनिल मुलकलवार, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, ब्रेफ संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराव दुर्गमवार, अप्रशिक्षीत शिक्षक कृती संघटनेचे रवी ठलाल, प्रदीप उईके यांनी केले. या आंदोलनाला बीआरएसपीचे विदर्भ राज्य प्रदेश सचिव विलास कोडापे, जिल्हा महासचिव सदाशिव निमगडे, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी भेट दिली.