‘अपघाता’ने झाला गोवंश तस्करीचा भंडाफोड, चालकाचा पोबारा
By गेापाल लाजुरकर | Published: August 19, 2023 03:54 PM2023-08-19T15:54:51+5:302023-08-19T16:01:57+5:30
येलचिलच्या वळणावरील घटना
गडचिरोली : गोवंशाची अवैधरित्या जीपमधून वाहतूक करणारे वाहन अनियंत्रित झाल्याने शनिवारी पहाटे अहेरी तालुक्याच्या येलचिल पहाडीवरील वळणावर उलटले. यातील जनावरे रस्त्याच्या कडेला फेकल्या गेली. दरम्यान वाहन उलटताच चालक व त्याच्या सोबत्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. वाहन क्षतिग्रस्त झाल्यामुळेच गोवंश तस्करीचा भंडाफोड झाला.
आलापल्ली- एटापल्ली मार्गावर असलेल्या येलचिल पहाडीच्या नाल्यावरील वळणावर शनिवारी पहाटे गोवंश तस्करी करणारे चार चाकी वाहन उलटले. यात लहान-मोठे गोवंश गंभीर जखमी झाले. गोवंशाची तस्करी करणारे वाहन नेमके कुठून आले आणि कुठे जात होते, याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही. विशेष म्हणजे, सदर वाहनावर नंबर प्लेटसुद्धा नव्हते. त्यामुळे वाहन कुणाच्या मालकीचे आहे, याबाबतसुद्धा माहिती मिळू शकली नाही.
घटनेची माहिती मिळताच येलचिल मदत केंद्रातील पोलिसांनी घटनास्थळ गाठून चिखलात फसलेल्या गोवंशाला बाहेर काढले व जखमी झालेल्या गोवंशावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार करून घेतला. घटनेचा अधिक तपास येलचिल पोलिस करीत आहेत.