फसवणूक करणाऱ्यांना अटक
By Admin | Published: June 11, 2017 01:23 AM2017-06-11T01:23:30+5:302017-06-11T01:23:30+5:30
शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवकांना लुबाडणाऱ्या दोघांना कुरखेडा पोलिसांनी अटक केली आहे.
चार दिवसांचा पीसीआर : नोकरी आमिष दाखवून लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवकांना लुबाडणाऱ्या दोघांना कुरखेडा पोलिसांनी अटक केली आहे. महेश हरिभाऊ गायधने (३५) रा. नवेझरी ता. तिरोडा जि. गोंदिया व अनिल दादाजी वानखेडे (४२) रा. श्रीरामनगर कुरखेडा अशी आरोपींची नावे आहेत.
महेश गायधने व अनिल वानखेडे यांनी नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ या कालावधीत कुरखेडा तालुक्यातील काही बेरोजगारांना वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आॅर्डिनन्स फॅक्टरीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. पैसे दिल्याने आपणास निश्चितपणे नोकरी लागेल, अशी बेरोजगारांना आशा होती. परंतु दोन वर्षे उलटूनही नोकरी लागत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी दोघांकडे पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावला. मात्र ते चालढकल करु लागले. शिवाय काही जणांना दिलेले बँकेचे धनादेशही वठले नाही. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे युवकांच्या लक्षात आले. त्यानंतर बेरोजगार युवकांच्या वतीने कुरखेडा येथील विशाल वसंतराव मडावी याने ८ जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश कुरखेडा पोलिसांना दिले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २४ तासांच्या आत महेश गायधने व अनिल वानखेडे यांच्यावर भादंवि ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संजय मेश्राम, वसंत जौंजाळकर प्रकरणाचा तपास करीत आहेत.