कारागृहात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:14 AM2018-03-14T01:14:53+5:302018-03-14T01:14:53+5:30
गडचिरोली शहरापासून ६ किलोमीटरवर असलेल्या खुल्या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात आला आहे.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : गडचिरोली शहरापासून ६ किलोमीटरवर असलेल्या खुल्या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात आला आहे. त्यासाठी ३० लाखांचा खर्च येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची आशा कारागृह प्रशासनाला आहे.
गडचिरोलीत २०१५ मध्ये खुले कारागृह सुरू झाले. १७ हेक्टर जमिनीत हे कारागृह उभारले आहे. या ठिकाणी शेतीसाठीही जमीन उपलब्ध आहे. सद्यस्थितीत कारागृहात ७५ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र विविध गुन्ह्यातील ६० कैदी सजा भोगत आहेत. हे कारागृह शहरापासून लांब आहे. शिवाय कारागृहाच्या सभोवताल तारांचे कुंपनही नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्या परिसरात सीसीटीव्ही लावणे आवश्यक असल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे.
भविष्यात हे खुले कारागृह बंद कारागृहात परिवर्तित होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे.
जिल्हा नियोजन समितीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव पाठविताना कोटेशनही पाठविण्यात आले आहे. त्यानुसार जवळपास ३० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, असे कारागृहाचे प्रभारी अधीक्षक डी.एस. आडे यांनी सांगितले. समितीची मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सध्या या कारागृहाच्या परिसरात कैद्यांकडून शेतीसह विविध कामे करून घेतली जात आहेत.