जिल्हा कारागृहात उत्साहात साजरी झाली गुरुपौर्णिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:58 PM2019-07-16T22:58:48+5:302019-07-16T22:59:01+5:30
श्री श्री रविशंकर गुरुजी प्रणीत आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा कारागृहात मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच मागील सात दिवसांपासून कारागृहात कैद्यांसाठी सुरू असलेल्या आर्ट आॅफ लिव्हिंगच्या आनंद अनुभूती शिबिराचीही सांगता करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : श्री श्री रविशंकर गुरुजी प्रणीत आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा कारागृहात मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच मागील सात दिवसांपासून कारागृहात कैद्यांसाठी सुरू असलेल्या आर्ट आॅफ लिव्हिंगच्या आनंद अनुभूती शिबिराचीही सांगता करण्यात आली.
जिल्हा कारागृहात गुरुपौर्णिमा उत्सवानिमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कारागृह अधीक्षक बी. सी. निमगडे होते. तसेच तुरुंग अधिकारी चोपकर, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी नितीन हेमके, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या योगशिक्षिका अंजली कुळमेथे, माधुरी दहिकर, गडचिरोली वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, किशोर खेवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुपूजन करण्यात आले. त्यानंतर सुमधुर भजन सादर करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रभारी कारागृह अधीक्षक निमगडे म्हणाले की, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या आनंद अनुभूती शिबिराचा सर्वांनाच लाभ झाला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला अतिशय मानाचे स्थान आहे. आपल्या आयुष्यात कुठल्या रूपात गुरू येईल हे कुणी सांगू शकत नाही. म्हणून गुरुजनांचा सन्मान करणारी ही गुरुपौर्णिमा प्रत्येकाने साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात वनपरिक्षेत्राधिकारी हेमके व इतर मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या आनंद अनुभूती शिबिरात सहभागी झालेल्या कैद्यांनी आपले अनुभव कथन केले. या शिबिराच्या माध्यमातून सकारात्मक जगण्याची ऊर्जा मिळाली असून उर्वरित आयुष्य हा सकारात्मक आनंद सर्वांना वाटण्यासाठी घालवू. योग, प्राणायाम, ध्यानाचे महत्त्व इतरांना सांगून त्यांना सुदर्शन क्रियेचा लाभ मिळवून देऊ, असा निर्धार कैद्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर कारागृह परिसरात मान्यवरांच्या हस्ते पिंपळाचे रोप लावण्यात आले. तसेच भजन मंडळाच्या भक्तीगीतांचा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमाला आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराचे सदस्य, जिल्हा कारागृहाचे कर्मचारी व कैदी उपस्थित होते.