जिल्हाभर वृक्ष लागवडीचा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:15 PM2019-07-01T22:15:26+5:302019-07-01T22:16:10+5:30
३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत जिल्ह्यात सोमवारी पहिल्याच दिवशी सुमारे २२ हजार २७० रोपट्यांचे रोपण करण्यात आले. वन विभाग, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी व राजकीय पदाधिकारी वृक्ष लागवडीच्या या कामात व्यस्त होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत जिल्ह्यात सोमवारी पहिल्याच दिवशी सुमारे २२ हजार २७० रोपट्यांचे रोपण करण्यात आले. वन विभाग, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी व राजकीय पदाधिकारी वृक्ष लागवडीच्या या कामात व्यस्त होते.
गडचिरोली जिल्ह्याला सुमारे १ कोटी ८ लाख ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शासकीय कार्यालये, वन विभागाने वृक्ष लागवड करावी व त्याची प्रसिध्दी करावी, असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने दिले असल्याने सकाळपासूनच कर्मचारी वृक्ष लागवडीचे नियोजन करीत होते. आठ दिवसापर्यंत पाऊस झाला नव्हता. त्यामुळे वृक्ष लावायचे कसे, असा प्रश्न पडला होता. मात्र चार दिवसांपूर्वीपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीतील अडथळे दूर झाले. वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावलेल्या वृक्षांची संख्या कळावी, यासाठी शासनाने स्वतंत्र वेबसाईट, मोबाईल अॅप व कॉलसेंटर तयार केला आहे.
सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे २२ हजार २७० वृक्षांची लागवड झाली असल्याचे वृक्ष लागवडीच्या वेबसाईटवर दिसत आहे. यामध्ये वन विभागाने सर्वाधिक १७ हजार ७५०, सामाजिक वनिकरण विभागाने ३ हजार ५२०, नगर परिषद, नगर पंचायतींनी १ हजार वृक्षांची लागवड केली आहे. वन विभागाने उद्दिष्टापेक्षा अधिक १ कोटी १२ लाख १४ हजार ९१० खड्डे खोदले आहेत. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने वन विभाग उद्दिष्टाएवढे वृक्ष लागवड करणार आहे. नोंदणीसाठी वन विभागाने माय प्लॅन्ट हा अॅप तयार केला आहे. त्यावर वृक्ष लागवड नोंदणीची सुविधा आहे.
मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७२ हजार ४२६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ५४ लाख ६० हजार ६६६ वृक्षांची लागवड झाली.
आलापल्लीत विविध संस्थांचा पुढाकार
वन विभाग आलापल्ली, अहेरी, आलापल्ली वन परिक्षेत्राधिकारी कार्यालय, उडाण फाऊंडेशन, राणी दुर्गावती विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आलापल्ली यांच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडला. वृक्षदिंडीला आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे, उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे, संतोष मंथनवार यांनी वृक्षदिंडीला हिरवी झेंडी दाखविली. वन विभागाच्या कक्ष क्रमांक ४२ मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक तांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून आलापल्लीच्या सरपंच सुगंधा मडावी, नागेपल्लीचे सरपंच सरोज दुर्गे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत ठेपाले, डॉ. चरणजितसिंह सलुजा, लक्ष्मण येर्रावार, उपसरपंच पुष्पा अलोणे, रेखा तलांडे, आशिष झाडे, विनोद अंकपल्लीवार, सलिम शेख, सुधाकर पेद्दिवार, कैलास कोरेत, लक्ष्मण गंजीवार आदी उपस्थित होते. आभार अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी मनोज चव्हाण यांनी मानले. यावेळी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे म्हणाले, वृक्ष लागवड करून निसर्ग संगोपण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वृक्ष लागवड हाच तरणोपाय आहे, असे मार्गदर्शन केले.
गडचिरोलीत ५०० वृक्षांची लागवड
गडचिरोली नगर परिषदेने शहरात एकाच दिवशी ५०० वृक्ष लावले आहेत. नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शिक्षण सभापती वर्षा बट्टे, महिला व बाल कल्याण सभापती गीता पोटावी, नगरसेविका अल्का पोहणकर, अनिता विश्रोजवार, वैष्णवी नैताम, रंजना गेडाम, नगरसेवक प्रमोद पिपरे, भुपेश कुळमेथे, केशव निंबोड, गुलाब मडावी यांच्यासह मुख्याधिकारी संजीव ओहोड व कर्मचारी हजर होते.